जुन्नर : शिवजयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय शिवनेरी मॅरेथॉनचा थरार उद्या पहाटे (ता.१२) शिवनेरी प्रदक्षिणा मार्गावर रंगणार आहे. राज्यभरातील अनेक नामवंत धावपटूंसह 1100 धावपटू या मॅरेथॉनसाठी जुन्नरमध्ये दाखल झाले आहेत. खास या मॅरेथॉनसाठी इथोपियातूनही धावपटू दाखल झाले आहे.
शिवनेरी किल्ला पायथ्याला रविवार, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पहाटे 6.30 वाजता आमदार अतुलशेठ बेनके, पोलिस महानिरिक्षक दिलीप भुजबळ पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनचा आरंभ होणार आहे.
जुन्नरमध्ये यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने प्रथमच खुली राज्यस्तरीय मॅरेथॉन होत असून त्यामध्ये गावोगावच्या तरुणाईसह राज्यभरातील शिवप्रेमी तरुणाईने सहभाग नोंदवला आहे. यात धुळे, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, ठाणे येथील धावपटूंचा उल्लेखनिय सहभाग आहे. जगातील सर्वात अवघड ट्रायथिलॉन समजली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा विजेते, आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन ते देशभरातील अनेक मॅरेथॉन गाजवलेले 25 हून अधिक धावपटू या स्पर्धेत सहभागी होवून स्पर्धकांसोबत धावत प्रोत्साहन देणार आहेत, अशी माहिती मॅरेथॉन संचालक संतोष डुकरे यांनी दिली.
मॅरेथॉनचा प्रदक्षिणा मार्ग
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला दत्त मंदिरापासून मॅरेथॉनला सुरवात होणार असून सर्व गटांचा समारोपही त्याच ठिकाणी होणार आहे. अनुक्रमे 21.1, 10, 5 व 3 किलोमिटर गटात ही मॅरेथॉन होणार आहे. संपूर्ण मार्गावर वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवक व पोलिस दल, होमगार्ड उपस्थित असेल. दहा किलोमिटर गटातील धावपटू शिवनेरी किल्ल्याला एक प्रदक्षिणा तर 21.1 किलोमिटर गटातील धावपटू किल्ल्याला दोन प्रदक्षिणा घालणार आहेत.
सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था
जुन्नर पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत तालुका आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉनसाठी पाच सुसज्ज वैद्यकीय पथके, एका कार्डिओ अँम्ब्युलन्स सह तीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जुन्नर नगरपरिषदेमार्फत फिरती शौचालये, पाण्याचे टँकर तर कुसूर ग्रामपंचायत व श्री शिवाई देवी मंदिर ट्रस्ट किल्ले शिवनेरी मार्फत पार्किंग आणि सुलभ शौचालय संकूल मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटू व त्यांच्या कुटुंबियांसाठी उपलब्ध कऱण्यात आली असल्याचे शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी सांगितले.
सहभागी, सहयोगी संस्था
चाईल्डफंड इंडिया, शिवाई देवी देवस्थान ट्रस्ट किल्ले शिवनेरी, फोरकास्ट अॅग्रीटेक, मोरे मिसळ अॅन्ड रेस्टॉरंट, पिंपरी चिंचवड रनर्स समुह, शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान, साई श्रद्धा मेडिकल फाऊंडेशन, डॉ. के.एस. खराडे फाऊंडेशन आदी संस्था संघटना या उपक्रमात सहभागी असून आमदार मा. अतुलशेठ बेनके, आरोग्य विभाग, जुन्नर पोलिस दल, जुन्नर नगरपरिषद यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
– – – –