पुणे-लय, दिलखेचक अदाकारी, ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले, ठसकेबाज लावण्या त्याला प्रेक्षकांनी शिट्या वाजवून आणि नाचून दिलेला प्रतिसाद अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणीचा खणखणाट व घुंगरांचा छनछनाट हा लावणी कार्यक्रम रंगला.
३५ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत कविता प्रॉडक्शन पुणे प्रस्तुत पप्पू बंड निर्मित लावणीचा खणखणाट व घुंगरांचा छनछनाट सह ऑर्केस्ट्रा अल्बेला हा लावण्यांचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे मंगळवारी दुपारी पार पडला. या कार्यक्रमाला पुरुषांबरोबरच महिलांनी प्रचंड गर्दी करून उस्फूर्त प्रतिसाद दिला. गण, गवळण, मुजरा, पारंपारिका लावण्या ते नवीन लावण्यांना प्रेक्षकांनी शिट्या वाजवून दिलेली दाद.. ढोलकीच्या तालावर थीरकलेली पावले..पुरुषांबरोबरच महिलांनी केलेली गर्दी अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, बाळासाहेब अमराळे, नरेंद्र काते यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
रीलस्टार सोनाली गायकवाड यांनी आपल्या अदाकारीने सादर केलेल्या, ‘ईचार काय हाय तुमचा..’ या लावणीला रसिकांनी डोक्यावर घेतले. नंदिनी पुणेकर यांनी सादर केलेल्या ढोलकीच्या तालावर या ठसकेबाज लावणीला पुरुष आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रा यांनी सादर केलेल्या, ‘नाकी डोळी छान ..’यालाही रसिकांनी दाद दिली. राधिका पुणेकर यांनी, ‘नटले तुमच्यासाठी आणि शीतल चोपडे यांनी आपल्या एका वेगळ्या अदाकारीने सादर केलेल्या, ‘नादखुळा.. नादखुळा…’ या लावणीला भरगच्च भरलेल्या नाट्यगृहातील रसिकांनी डोक्यावर घेतले. याशिवाय ‘या रावजी.. बसा भावजी’, ‘पारवं घुमतय कसं..’, ‘ज्वानीचा मसाला..’ ‘कैरी पाडाची..’ अशा एकापेक्षा एक लावण्या सादर करून या कलाकारांनी रसिकांना तृप्त केले. चेतन आणि वैष्णवी यांनी गवळण सादर केली.
डॉ. श्रीधर मोरे आणि शैलेश येवले यांनी दिलेले संगीत, गायिका अर्चना तावरे आणि गायक स्वप्नील साळवी यांनी गायलेल्या लावण्या आणि गाणी याने रंगत आणली. तर या कार्यक्रमाचे अॅंकरींग गणेश देसाई उर्फ पॅडी यांनी केले. नेपथ्य सचिन यांनी केले. साऊंड आणि लाईटचे व्यवस्थापन सागर लोंढे यांनी केले
पुणे फेस्टिव्हल कमिटी प्रमुख अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे व मोहन टिल्लू यावेळी उपस्थित होते.