पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल हे देशातील दहा वर्षांच्या निरंकुश सत्तेला लगाम घालणारे आहेत, असे मत ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सहयोगी संपादिका आणि लेखिका नीरजा चौधरी यांनी शनिवारी व्यक्त केले. देशात पुन्हा एकदा आघाडी सरकार सत्तेवर आले असले तरी महत्त्वाची खाती आपल्याकडे कायम ठेवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले, या वास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंडस ऑफ व्यंकटेश यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यान पुष्प नीरजा चौधरी यांच्या व्याख्यानाने गुंफले गेले. ‘आजची राजकीय पत्रकारिता आणि निवडणुका’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी या वेळी व्यासपीठावर होते.
चौधरी म्हणाल्या, दहा वर्षे पूर्ण बहुमताचे सरकार चालविल्यानंतर निवडणुकीचे निकाल जाहीर होताच ‘आम्ही आघाडी सरकार यशस्वीपणे चालवू शकतो’, असे भाजप नेत्यांनी जाहीर केले. ‘सरकार बहुमताने होत असले तरी देश सहमतीवर चालतो’, अशी भाषा भाजप नेत्यांनी सुरू केली. आघाडी सरकारचे नेतृत्व करताना काही तडजोडी कराव्या लागतात. मात्र, आघाडी सरकारमध्येही महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवण्यात भाजपला यश आले आहे. समान नागरी कायद्याचा मुद्दा सभागृहात संमत होऊ शकला नाही तर पूर्ण बहुमत द्यावे, असे आवाहन केले जाऊ शकते.
भाजप सहजगत्या बहुमत प्राप्त करेल असे वाटत असताना अचानकपणे ही निवडणूक गुंतागुंतीची झाली. चारशेपार झाल्यानंतर राज्यघटना बदलून आपले आरक्षण रद्द होईल ही भावना दलित समाजाची झाली. त्याचा परिणाम भाजपच्या जागा कमी होण्यावर झाला. उत्तर प्रदेशात असंतोष असला तरी आक्रोश दिसला नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेस विजयी झालेल्या ३३ जागा मिळवल्या असत्या तर भाजप बहुमताजवळ पोहोचला असता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्या असल्या तरी मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली बिहार या राज्यांमध्ये संपूर्ण यश का मिळाले हा प्रश्न अनुत्तरितच राहतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान शरद पवार एका मुलाखतीमध्ये केले असले तरी त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे वाटत नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देताना चौधरी यांनी सांगितले. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्य होतील हे त्यांच्या आई-बहिणीलाही माहीत नव्हते. मात्र, संवाद साधताना त्यांची भाषा हा अडसर ठरू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.