#Manoj Jarange Patil: मराठय़ांच्या आरक्षणाची दिंडी पुण्याहून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ

The Marathas reservation is on its way from Pune towards Mumbai ​
The Marathas reservation is on its way from Pune towards Mumbai ​
Spread the love

Manoj Jarange Patil | Maratha Reservation:  डौलाने फडफडणारे भगवे ध्वज…वाहनांच्या लांबच लांब पण लयबद्ध रांगा…त्या मागोमाग शिस्तबद्धपणे पुढे सरकणारा मराठय़ांचा महाप्रवाह… एकच मिशन, मराठा आरक्षण…ही एका सुरात दिली जाणारी घोषणा….अन् या सर्वास मिळालेली नियोजनबद्धतेची जोड….अशा उत्स्फूर्त वातावरणात मराठय़ांच्या दिंडी बुधवारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. समाजबांधवांकडून पुण्यनगरीत पुष्पवृष्टी करीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. (The Marathas reservation is on its way from Pune towards Mumbai)

पुण्यातील खराडी येथून सकाळी साडे दहाच्या सुमारास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांची पायी वारी उत्साहात निघाली. ट्रक, टेम्पोसह अन्य वाहने एका रेषेत पुढे सरकू लागली. त्यावर बसलेले मराठा आंदोलक भगवे ध्वज डौलाने फडकवत होते. भगव्या टोप्या, गळय़ात उपरणे  घातलेले बांधव ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, असा घोष करीत एकेक पाऊल शिस्तीत पुढे टाकत होते. ठिकठिकाणी, चौकाचौकात मराठय़ांच्या या प्रवाहाचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात येत होते. दुपारी एक वाजता मराठाजनांचा हा प्रवाहो खराडी बायपास येथे एकवटला. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या बांधवांकडून स्वागताचा व शुभेच्छांचा स्वीकारत करीत ही दिंडी मार्गक्रमण करू लागली. 

अधिक वाचा  पुणे महानगरातील श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलनअभियान पूर्णत्वाच्या दिशेने:सर्वसामान्यांपासून तृतीय पंथीयांनीसुद्धा नोंदवला सहभाग

 तोवर पुणे शहर व परिसरातील संपूर्ण वातावरण फुलून गेले होते. शिवाजीनगर येथील संचेती चौक परिसरात मनोज जरांगे पाटील व त्यांच्या दिंडीच्या स्वागतासाठी अक्षरशः गर्दीचा महापूर लोटला होता. विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांचे डोळे जरांगे याच्याकडे लागले होते. सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास जरांगे व त्यांच्यासोबतच्या मराठा बांधवांचा मेळा संचेती चौकात दाखल झाला अन् या मेळय़ाला महामेळय़ाचे स्वरुप प्राप्त झाले. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ाने सगळय़ांचे लक्ष वेधून घेतले. वातावरणात अनोखे चैतन्य निर्माण झाले. फुलांची उधळण करीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. कॅमेरे सरसावले. तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला. जय भवानी, जय शिवाजीचा स्वर टीपेला पोहोचला. ‘स्वराज्य संघटने’च्या वतीने क्रेनच्या साहय़ाने महाकाय हार घालून जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. जरांगे यांनी उपस्थितांना अभिवादन करीत लढण्याचा निर्धार व्यक्त केला आणि दिंडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेला वळाली. 

अधिक वाचा  उच्च शिक्षणातूनच प्रगतीचा वेग वाढेल : नारायण मूर्ती यांचा विश्वास, डॉ. विजय भटकर यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार' प्रदान

 प्रजासत्ताकदिनी मराठय़ांचा आवाज मुंबईत घुमणार 

गुरुवारी मराठय़ांचा हा महामेळा मुंबईकडे कूच करेल. 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठय़ांचा आवाज राजधानी मुंबईत घुमणार असून, याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love