कोल्हापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल करत आंदोलन केले. त्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांसाह विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना या हल्ल्याचे समर्थन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. “जे कर्म आपण या जन्मी करतो ते, या जन्मीच फेडावे लागते”, अशी खोचक टीका करत उदयनराजे यांनी या हल्ल्याचे समर्थन केलं आहे.
लोकशाही टिकवायची असेल तर घराणेशाही संपली पाहिजे. मात्र, राज्यामध्ये सध्या घराणेशाही सुरू आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष घराणेशाहीसाठी आपले पक्ष चालवत आहेत. मुलगा, मुलगी, नातू पक्षामध्ये आमदार खासदार होत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कोल्हापुरात आलेले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजे म्हणाले, राजकारणात घराणेशाही आली,ती घातक असून आज काँग्रेस पक्षाचे काय झाले आहे, त्या पक्षाची काय अवस्था झाले आहे हे आपण बघत आहोत. हीच अवस्था राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे होईल असं सांगून ते म्हणाले आम्हीच आम्ही असा अहंकार या पक्षांचा आहे.
पश्चिम महाराष्ट्राने त्यांना कायम भरभरून मतदान केले आणि त्यामुळेच त्यांना हा अहंकार आला आहे. परंतु, तुमच्यामुळे समाज नाही. लोकशाहीमध्ये ज्या पदावर आपण बसतो,ते जनतेमुळे मिळते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जो योगदान देईल, विकास करेल मग, तो कोणत्याही जातीचा असो त्याला संधी देण्याचे काम भाजपाने नेहमी केले आहे. काँग्रेसवाल्यांनी सत्तेचे केंद्रीकरण केले त्यामुळे काँग्रेसची अवस्था काय झाली आहे हे आपण आज बघतो आहोत असेही ते म्हणाले.