जनतेच्या दुःखावर मीठ चोळणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी – माधुरी मिसाळ


पुणे-संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचा कांगावा करून प्रत्यक्षात मात्र जनतेच्या दुःखाची कुचेष्टा करणारे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यादेखत महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागावी आणि सत्तेचा माज दाखवून सामान्य जनतेच्या दुःखावर मीठ चोळणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. जाधव यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभरातील महिला तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये असाच त्यांच्या उद्दाम वागण्याचा इशारा होता, हे त्या प्रसंगाच्या व्हिडीयोमधून राज्यभरातील जनतेस कळून चुकले आहे. मुख्यमंत्र्यांदेखत असा उद्दामपणा करूनही त्यांना कोणतीच समज न देता उलट त्यांच्याच इशाऱ्यावरून तेथून काढता पाय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या वागण्याचे समर्थन केले असून संकटग्रस्तांबाबत सरकार संवेदनशून असल्याचेच दाखवून दिले आहे. संपूर्णपणे उध्वस्त झालेल्या संकटग्रस्तांना तातडीची मदत देणे दूरच, मदतीची घोषणादेखील न करता हात हलवत परतणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांच्या माध्यमातून बेजबाबदारपणाचे जाहीर दर्शन घडविले आहे. तुमच्यावर कोसळलेल्या दुःखातून तुम्हीच स्वतःस सावरा, असा त्रयस्थ सल्ला देऊन संकटग्रस्तांच्या वेदनांवर मीठ चोळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांच्यासारख्या उद्दाम आमदाराचा जनतेच्या अपमानासाठी वापर करून घेतल्याने मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे आमदार मिसाळ म्हणाल्या.

अधिक वाचा  स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती पुढे ढकलावी: का केली विनायक मेटे यांनी ही मागणी?

भास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीचे अनेक दाखले याआधीही महाराष्ट्रास मिळाले असतानाही मुख्यमंत्री सातत्याने त्यांची पाठराखण करतात, त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आमदार जाधव यांचा उद्दामपणा मोकाट सुटला आहे, असा आरोपही आमदार मिसाळ यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love