कौटुंबिक वादातून जातपंचायतीने कुटुंब चक्क वाळीत टाकले


पुणे- पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला जातपंचायतीकडून चक्क वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 16 मार्च 2018 पासून 1 सप्टेंबर 2021 या कालावधीत न्यू दत्त नगर वाकड आणि महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे घडला.

याप्रकरणी सिताराम कृष्णा सागरे (33, रा. न्यू दत्त नगर, वाकड. महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे (चौघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), मोहन शामराव उगाडे, मनोज सागरे, विजय सागरे, रामदास भोरे, अमर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णू वाघमारे, अमृत भोरे, गोविंद वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  'मी...येसूवहिनी' या सांगीतिक अभिवाचन कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गोंधळी समाजाचे आहेत. आरोपी त्यांच्या समाजामध्ये जात पंचायत चालवितात. आरोपी करेप्पा, बाजीराव, साहेबराव आणि बाळकृष्ण हे त्या जातपंचायतीचे पाटील आहेत. तर अन्य आरोपी पंच म्हणून काम पाहतात. फिर्यादी यांची पत्नी ही जातपंचायतीच्या पाटलांची नातेवाईक आहे. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा दावा न्यायालयात चालू आहे.

असे असताना फिर्यादीने जातपंचायतीकडून घटस्फोट घेतला नाही, याचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले. याप्रकरणी सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम 2016 चे कलम 5, 6 प्रमाणे तसेच भारतीय दंड विधान 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love