पुरस्कारामुळे या पुढील काळात काम करण्यास बळ मिळेल- आशा खाडिलकर


पुणे – ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे (pandit vasantrao deshpande) आणि पं. जीतेंद्र अभिषेकी (jitendra Abhisheki) यांच्या मार्गदर्शनामुळे संगीतनाटक क्षेत्रात नाट्यपदे सादर करण्याची संधी मिळाली हा माझासाठी आशीर्वाद आहे. तसेच मा. दीनानाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिळालेल्या ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर पुरस्कारा’ने या पुढील काळात काम करण्यास बळ मिळाले आहे अशी भावना ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांनी व्यक्त केली.

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील स .प . महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सिनेसंगीत अभ्यासक सुलभा तेरणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जुन्या रेकॉर्डचे संग्राहक आणि संगीत नाटकांचे अभ्यासक राजेंद्र ठाकूरदेसाई, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल आणि स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे व्यासपीठावर उपस्थीत होते. या कार्यक्रमात ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर’ पुरस्कार गायिका आशा खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह,अकरा हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अधिक वाचा  रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन: एरलिफ्टने 1000 मे टन ऑक्सिजन रूग्णांपर्यंत नेण्यासाठी 24 टँकर तैनात

  या पुरस्कारामुळे नक्कीच आनंद झाला आहे असे सांगून त्या म्हणाल्या, ‘हा पुरस्कार म्हणजे शाबासकी आहे. मी अजूनही विध्यार्थिनी आहे आणि या पुढील काळातही शिकत राहणार आहे. हा पुरस्कार माझे आई-वडील,गुरुजन आणि रसिक यांच्यामुळे मिळाला आहे. त्यामुळे कै.पं. वसंतराव देशपांडे यांच्या चरणी अर्पण करते. पं. वसंतराव देशपांडे यांच्या बरोबर काम करण्याची आणि बालगंधर्व यांच्या रचना सादर करण्याची संधी मिळाली, तसेच मा. दीनानाथ यांच्या रचना देखील गाता आल्या. पं. वसंतरावांनी माझा कडून नाट्यपदे तयार करून घेतली आणि पं. अभिषेकीबुवा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पाच संगीत नाटकांचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली असे त्या म्हणाल्या’. रसिकांच्या आग्रहसत्व ‘शतजन्म शोधिताना’ हे नाट्यपद टाळ्यांच्या गजरात त्यांनी सादर केले.

सिने संगीताच्या अभ्यासक सुलभा तेरणीकर याप्रसंगी म्हणाल्या कि, ‘संगीत कलेवर प्रेम करणाऱ्या गायिकेचा   या पुरस्काराने गौरव झाला आहे. नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीताची वाट अवघड आहे तरी देखील संगीत रंगभूमीची सेवा आशा खाडिलकर यांनी मनापासून केली आहे.’

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडले : गंभीर दुखापत

पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ आता मागे पडला असला तरी  आजच्या काळातही नाट्यसंगीत आपलेसे वाटते. हा वारसा पुढे नेण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनीही महत्वपूर्ण योगदान दिले आहे’. आशा खाडिलकर यांनी पुण्यात लवकरच नाट्य-संगीताचा कार्यक्रम करावा अशी विनंती त्यांनी केली.

‘स्वरप्रतिभा’चे संपादक आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे म्हणाले की, ‘संगीताला समर्पित स्वरप्रतिभा दिवाळी अंक २० वर्ष पूर्ण करीत असून, आतापर्यंत मा. दीनानाथ मंगेशकर,लता मंगेशकर यांच्यावरील तीन अंक, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुमन कल्याणपूर, गीतरामायण अंक तीन वेळा पुनर्मुद्रित करावे लागले. महाराष्ट्रात सर्वत्र या अंकांचे स्वागत करण्यात आले.’ लवकरच पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील  विशेषांकाचे प्रकाशन करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

प्रारंभी युवा गायिका तन्मयी मेहेंदळे यांनी राग बागेश्री मधील ‘याद करो ध्यान, धरो माता सरस्वती’ ही मध्य तीनतालातील बंदिश सादर केली. आशा खाडिलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नीलिमा बोरवणकर यांनी सूत्रसंचालन केले, टीम स्वरप्रतिभाच्या वतीने श्रुती तिवारी यांनी आभार मानले.

अधिक वाचा  एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीला जनता पुन्हा फसणार नाही- केशव उपाध्ये

यानंतर सुलभा तेरणीकर आणि राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी ‘मा. दीनानाथ जीवन आणि संगीत – वसा आणि वारसा’ हा श्राव्य कार्यक्रम सादर केला. मा. दीनानाथ चरित्र आणि त्यांची कन्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी सांगितलेल्या आठवणी सुलभा तेरणीकर यांनी सांगीतल्या. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी मा. दीनानाथ यांच्या नाटक आणि संगीताबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन केले. मा.  दीनानाथ यांचे सुपुत्र आणि सुकन्या यांनी पुढे नेलेल्या संगीत वारश्याबद्दल आणि संगीताबद्दलही विवेचन केले. मानापमान, रणदुंदुभी ,भाव-बंधन, संन्यस्तखड्ग अशी संगीत नाटके आणि पं. हृदयनाथ तसेच मीना मंगेशकर खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या रचना त्यांनी ऐकवल्या. मंगेशकरी संगीत  निरूपणासह ऐकवण्यात आले. रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती आणि उत्तम दादही दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love