पुणे: तबल्याच्या विश्वात उदयास आलेले प्रसिद्ध ओजस अढीया, फारूकाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी कर्नाटक शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहात नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे सादरीकरण इतके मनमोहक होते की प्रेक्षक त्यात हरवून गेले.
प्रसिद्ध तबलावादक अनुप जोशी व प्रज्ञा देव यांनी स्थापन केलेल्या संगीत साधना गुरूकल आश्रम संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय अनुभूती संगीत सभेत एकल तबला वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध तबलावादकांनी प्रस्तुतीकरण करून हा दोन दिवसीय कार्यक्रम संस्मरणीय बनविला. यामध्ये अनेक लोकप्रिय आणि अप्रचलित बंदिशींचे सादरीकरण झाले. त्यांच्या सादरीकरणाची जादूच अशी होती की श्रोतांच्या बोटांना थिरकण्यापासून कोणीच थांबवू शकले नाही. मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर उत्तम साथ संगत केली.
तबलावादकांनी तबल्याला स्पर्श करताच श्रोते मंत्रमुग्ध होऊन आत्म अनुभूती घेत होते. या सर्व तबलावादकांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी तबला वाजवतांना श्रोत्यांशी आत्मिक नाते निर्माण केले. या कलाकारांसाठी सर्वात मोठे बक्षीस म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट.
प्रसिद्ध तबलावादक ओजस अढीया यांच्याकडे तबल्याची भाषा जिवंत करण्याची क्षमता आहे. अव्वल तबलावादक असण्याबरोबच त्यांनी त्यांच्या घराणाच्या वादनाच्या शैलीनुसार इतर घराण्यातील बंदिशीही सादर केल्या. उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाची सुरूवात अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलूरकर यांच्या एकल तबला वादनाने झाली. कल्पतरू ठाकरे ंयानी त्यांना हार्मोनिअमवर साथ संगत केली. तबला वादनाची सुरूवात पेशकारने झाली व त्यानंतर कायदा, रेला आणि बंदिशीने कार्यक्रमाच शेवट झाला.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात म्हणजे रविवारच्या सकाळी फारूखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी तबल्यावर अनुभवी हातानी थाप मारली तेव्हा प्रेक्षक भावनेने भरून गेले. अगदी अवघड गोष्टी सुद्धा त्यांनी अगदी सहज वाजविल्या. त्यांच्या तबला वादनाने श्रोत्यांवर जादू केली. त्यांच्या वादनात तबल्याचे बारकावे होते.
यावेळी ज्येष्ठ तबलावादक पं. ओंकार गुळवाडी, पं. रामदास पळसुले, पुरातत्वविद्या शास्त्रज्ञ गो. बं. देगलुरकर, गोविंद बेडेकर, सुरेंद्र मोहिते, मनीष गुप्ता आणि टेनएक्सचे हरीश भाबड आणि नेक्सजेन एज्युकेशनचे संभाजी चवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संगीत साधना गुरूकुल आश्रमाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनुप जोशी, प्रज्ञा देव, अमित दरेकर, अमोल भट हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे पुण्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.