पुणे- पुणे शहरातील कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये मार्केटमधील चिकन, मटन आणि मासळीची एकूण २५ दुकाने जळून खाक झाली तर या गाळ्यांमध्ये असलेल्या कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने या आगीत कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशमन जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे एक तासात आग आटोक्यात आली.
पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केट हे ७० वर्षे जुने मार्केट आहे. याठिकाणी मटन, चिकन आणि मासळी विक्रीचे गाळे आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास याठिकाणी आग लागली. त्यामध्ये मटन, चिकनची आठ तर मासळी विक्रीची १७ दुकाने जाळून खाक झाली. या आगीत गाळ्यांमध्ये असलेल्या बकरे आणि कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला तर गाळ्यांमधील फ्रीज, इलेक्ट्रिक वजनकाटे, इलेक्ट्रिक मित्र बॉक्स, कापडी व प्लास्टिकचे साहित्य, कागदी साहित्य, विक्रीचा सर्व माल जाळून खाक्झाला. तसेच आगीमुळे बांधकामाचा मोठा भाग खाली कोसळला.
याबाबत छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजूर नझीर शेख यांनी त्यांचा जबाब पोलिसांकडे नोंदवला असून त्यामध्ये त्यांनी त्यांना पाहते ३ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आबिद फरीद शेख यांचा आगीबाबत फोन आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ कॅन्टोंमेंटच्या अग्निशमन दलाला ही माहिती दिल्यानंतर आगीच्या घटनास्थळी महापालिकेच्या ३ अग्निशमन गाड्या, २ पाण्याचे टँकर तसेच कॅन्टोंमेंटच्या दोन अग्निशमन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने एक तासात ही आग आटोक्यात आणली तर पाहते साडेसहाच्या सुमारास पूर्ण आग विझवण्यात त्यांना यश आले. या आगीत अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाले असावे असा अंदाज शेख यांनी व्यक्त केला आहे.