पुणे- पश्चिम बंगाल, आसाम,तामिळनाडू या राज्यांसह पाच राज्याच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष्य लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काटे की टक्कर सुरु आहे. दरम्यान, या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे. केवळ आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
आसाम वगळता इतर राज्यातील भाजपचा पराभव हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे. परंतु लोक निर्णय घेत असतात. पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे त्यामध्ये माझ्यादृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्या बाजूने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.