तेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर

महाराष्ट्र लेख
Spread the love

स्त्री जन्माची अपूर्व गाथा, जिने दाविली जना समस्ता

अबलांना त्या सबल कराया व्रत चालविले श्रद्धेतून,

धन्य धन्य ते पवित्र जीवन झाले प्रभूच्या स्वरूपी लीन

आज आषाढ शुद्ध दशमी; तेजस्वी हिंदुराष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न मनाशी बाळगून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून, महिलांना स्वसंरक्षणक्षम बनविण्यासाठी “राष्ट्र सेविका समिती” हे महिलांचे अखिल भारतीय शिस्तबद्ध संघटन उभे करणारया, तेजतपस्विनी वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांची आज जयंती .

खरेतर वंदनीय मावशीना प्रत्यक्ष बघण्याचे सौभाग्य लाभले नाही पण “मावशी” या शब्दातच एक आपलेपणाची भावना मनात उत्पन्न होते आणि डोळ्यांसमोर येत एक शांत, संयत, प्रसन्न लोभस व्यक्तिमत्त्व ; अंतःकरणातून सात्त्विक भाव दर्शविणारे, साधी रहाणी उच्च विचार सरणी असलेले व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जीवन चरित्रातील एक एक घटना समोर आली कि एक एक पैलू समोर येतो. मावशीचे रामायण प्रवचन वाचले तर रामायणाचा / अध्यात्माचा वेगळ्या पैलू ने  केलेला विचार समोर येतो.  त्यांनी उभ्या केलेल्या संघटनेचा इतिहास पाहिला कि समोर येते महिलांना काया वाचा मने  सुदृढ पणे उभे करण्याची त्यांची तळमळ, राष्ट्राला सशक्त करण्यासाठी दूरदृष्टीने विचार करून एक विशाल संघटन उभे करणाऱ्या  एक कुशल संघटक….  असे किती तरी पैलू वंदनीय मावशीच्या जीवन पटातून समोर येतात.

वंदनीय मावशी म्हणजेच पूर्वाश्रमीच्या कमल भास्करराव दाते. दाते कुटुंब मूळचे सातारचे. आर्थिकदृष्ट्या फारसं संपन्न नसलं तरी वैचारिक आणि वैचारिकतेने परिपूर्ण असे कुटुंब, समाजाप्रती कृतज्ञता भाव, राष्ट्रप्रेम, व स्वतंत्र भारताचा विचार हा घरातच रुजलेला; त्यांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्या काळी लोकमान्य टिळकांचे “केसरी” हे वृत्तपत्र वाचायला  बंदी असताना हि कमलची आई  यशोदाबाई “केसरी” हे वृत्तपत्र स्वतःच्या नावाने विकत घ्यायच्या  आणि शेजारच्या महिलाना  गोळा करून वृत्तपत्राचे सामुहिक वाचन करायच्या. कमल हे सर्व आत्मसात करत होती. त्या काळातील प्रथेनुसार “कमल” चौथी इयत्तेत पोहोचताच लग्नाचे प्रयत्न सुरू झाले आणि वयाच्या  १४ व्या वर्षी कमल “लक्ष्मीबाई पुरुषोत्तमराव केळकर” होऊन वर्धा येथे आली.

 पुरुषोत्तमरावांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. आईविना पोरक्या अपत्यांना आईची उणीव कधीही जाणवू  न देता लहान वयात कमलने  कुशलतेने घर सांभाळले. अवघे १०-१२ वर्षाचे वैवाहिक आयुष्य त्याच्या वाटेला आलं. अल्पशिक्षित आणि त्याकाळच्या संस्कृतीनुसार माजघर, स्वयंपाकघर  सांभाळताना मावशी नेहमीच समाजशील होत्या. पतीच्या हयातीत लक्ष्मी बाई आपल्या घरची जबाबदारी पार पाडत स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कार्यक्रम, प्रभातफेरी इत्यादी कार्यक्रमात सक्रिय होत्या, हे सर्व समजांच्या विरुद्ध होते.  ‘सीतेच्या जीवनातून राम निर्माण होतो ’ हे गांधींचे विधान त्यांना खूप काही सांगत असाव आणि त्यासाठीच कि काय त्यांनी रामायणाचा सखोल अभ्यास करून सीता समजाऊन घेतली. आणि त्यातूनच अनेक सीता घडविण्यासाठी त्यांची तळमळ सुरु साली. त्याकाळी महिलाकडे पहाण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा होता. महिलांसाठी विशेष कार्य करण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात येत होत. महिलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम कसे बनवायचे याबाबत त्यांच्या मनात रात्रंदिवस मंथन सुरू होते.

त्यातच आपल्या मुलाकडून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरु केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती लक्ष्मीबाईना मिळाली आणि असे काम महिलांसाठी हि असावे हे लक्ष्मीबाई केळकर याच्या मनात आले. महिलांसाठी काम करायचे असेल तर महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा हा विचार समोर आल्यावर पूजनीय डॉ हेडगेवार व लक्ष्मीबाई केळकर यांच्यात झालेल्या  चर्चेनंतर २५ ऑक्टोबर १९३६ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वर्धा येथे “राष्ट्र सेविका समितीची” स्थापना झाली. आपले राष्ट्र, आपल्या राष्ट्राचा गौरव, राष्ट्रप्रेम जागृत करण्याचा भाव हे स्त्रीवरच अवलंबून आहे. प्रेम आणि संस्कार यातून समाज घडविणे, हे तिचे आद्य कर्तव्य आहे. ती विशेष कर्तव्यदक्ष आणि कार्यकुशल असायलाच हवी. स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे, या आधार सूत्राने समितीचे काम सुरु झाले.


‘दोन महिलांना एकत्र काम करणे कधीही शक्य नाही’, हि उक्ती खोटी ठरवत एक एक सेविकारुपी मोती आपल्या संघटन माळेत जोडून त्या संघटन कार्य वाढवू लागल्या. पुण्यात सरस्वतीताई आपटे यांनी हि अशाच प्रकारे महिलांसाठी काम सुरु केल्याचे समजताच त्या स्वत: त्यांना भेटल्या. वं मावशीच्या स्नेहमय, भावपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे प्रभावित होऊन, सरस्वतीताई आपटे यांनी आपले पुण्यातील कार्य हि समिती कार्यात विलीन झाले.

समितीच्या स्थापनेनंतर पायाला अक्षरशः भिंगरी लावत वं. मावशीनी गावोगावी संपर्क करून समिती कार्य वाढविले. संघटनेच्या दृढीकारणासाठी परस्पर स्नेह विश्वास मनामानात जागवून त्या संघटनेत एक एक मोती कौशल्याने जोडू लागल्या. बकुळताई, वेणूताई अशा कितीतरी सेविका जोड्याल्या जाऊ लागल्या.

संघटना वाढवीत असताना, संघटनेसाठी आवश्यक असणारे बदल त्या स्वत: हि अंगीकारत होत्या.  संघटनेच्या जडणघडणीशी स्वत:ला जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सतत चालू होता.  सुरुवातीला त्यांना भाषणे देण्याचा सराव नव्हता. वक्तृत्व नव्हते. पण सामाजिक प्रबोधनासाठी समाजाला मार्गदर्शन करण्याची आंतरिक, अत्यंत इच्छा होती, त्यातूनच  सखोल अभ्यास करून, मुद्दे काढत प्रभावी  भाषण कला त्यांनी परिश्रमाने अवगत केली. मधुर आवाज, स्पष्ट उच्चार, भावपूर्ण शब्दांची निवड या सर्वांचा सुंदर संगम यामुळे त्यांचे वक्तृत्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असे. संपर्कासाठी प्रवास करावा लागणार त्यासाठी वयाच्या ४० व्या वर्षी त्या सायकल चालवायला शिकल्या.  

दूरदृष्टीने संघटनेचा बारकाईने विचार करत वंदनीय मावशीनी स्वतः सखोल विचारांनी संघटनेच्या ध्येयाचे रंग भरले. स्त्रियांना स्वसंरक्षणक्षम बनविण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक रित्या  सक्षम बनविण्यासाठी समितीच्या कामाचा आराखडा आखला.  स्वसंरक्षणासाठी समितीमध्ये शारीरिक शिक्षण, योगा यांचा अंतर्भाव करण्यात आला.

सेविका कशी असावी ? हा विचार मांडताना ती देवी अष्टभुजेप्रमाणे अष्टावधानी असावी असे सांगत, तिचे व्यक्तिमत्त्व संतुलित असावे, तरच ती समाजासाठी पोषक आणि प्रेरणादायी ठरेल, याची स्पष्ट रूपरेषा वंदनीय मावशीनी मांडली. अष्टभुजा देवीची मूर्ती आराध्यदैवत म्हणून सेवीकांसमोर ठेवली.  गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी बरोबरच आपल्या तेजोमय संस्कृतीचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकवावा हि कल्पना त्यांनी मांडली.  “वंदे मातरम”  ही आपल्या मातेची प्रार्थना ती गाताना हात जोडायालाच हवे हा संस्कार, हि  प्रथा त्यांनी रुजविला.

मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व याचा विशाल संगम म्हणजे वंदनीय मावशी. समिती कार्य का? याचे उत्तर देतांना त्या म्हणायच्या  “घर, संस्कृती, संस्कार याचा भक्कम आधार स्त्रीच आहे, स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे, राष्ट्राची उज्वल देशभक्त पिढी घडविण्याचे काम तिच्याच हातून घडणार आहे.  तेजस्वी हिंदुराष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी  तिने  संघटीत असायलाच हवे.”  याच ध्येयाने महिलांचे अखिल  भारतीय शिस्तबद्ध संघटन गेली ८५ वर्षे कार्यरत आहे.

१९३६ साली लावलेल्या “राष्ट्र सेविका समिती” या बीजाचे आज वटवृक्षात रुपान्तर झाले आहे. आज समितीचे कार्य विश्वव्यापी आहे ते वंदनीय मावशीनी केलेल्या देशभक्तीच्या  सिंचनामुळेच. ध्येयाने भारून जात, सर्वस्वाची आहुती देत, राष्ट्र निर्माणाच्या कार्यात आपला हातभार लागलाच पाहिजे या भावनेने राष्ट्र कार्यात आपल्या समिधा अर्पण कराव्या या वंदनीय मावशीच्या जीवनाचा आदर्श परिपाठ समोर ठेवत आजही समिती कार्य  पुढे जात आहे आणि असेच पुढे पुढे जात राहील यात शंका नाही.

व्यक्तिमत्वाचे ते तेज प्रशांत , नंदादिपासमान उजळत

अंधारातून मार्ग दाविते, वदते ती या या माझ्या मागून

धन्य धन्य ते पवित्र जीवन झाले प्रभूच्या स्वरूपी लीन

  • सौ. अपर्णा पाटील – महाशब्दे

९८२३७६६६४४

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *