पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरण घडल्यानंतर पुण्यातील अनधिकृत पब आणि बार वरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे एक्साईजला जबाबदार धरलं आहे. अंधारे आणि धंगेकर दोघांनीही थेट पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावरच थेट धडक दिली आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला परंतु, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर अधिकच संतापले आणि त्यांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. चला, बेकायदा पब-बार दाखवतो असं म्हणत त्यांनी पुढील ४८ तासांत या आस्थापनांवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला.
सुषमा अंधारेंनी कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची यादीच वाचली
सुषमा अंधारे यांनी अबकारी विभागाची अक्षरशः लाज काढत पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली. काही हजारांपासून ते लाखांपर्यंत ही यादी असल्याचे सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतून समोर आले. यावेळी शांत उभे राहून ऐकून घेण्याची वेळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी यांनी कार्यालयामध्ये पोहोचत पब संस्कृतीवर एक प्रकारे हातोडा टाकताना कारवाई कधी करणार? अशी विचारणा करत विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची माहिती दिली.
यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणार्या पोलिसांची नावे वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.
सुषमा अंधारे, धंगेकरांनी पब आणि हॉटेल्सच्या हप्त्यांची वाचून दाखवलेली यादी
द माफिया- 1 लाख रुपये
एजंट जॅक्स प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी 50 हजार रुपये
टू बीएचके- 1 लाख
बॉलर- २ लाख
राजबहादूर मिल्स बिमोरा- १ लाख
मिल्ट- १ लाख
टीटीएम रुफटॉप- ५ हजार
स्काय स्टोरी -५० हजार
जिमी दा ढाबा- ५० हजार
टोनी दा ढाबा- 50 हजार
आयरिश- ४० हजार
टल्ली टुल्स- ५० हजार
अॅटमोस्पिअर- 60 हजार
रुड लॉर्ड – ६० हजार
24 के- दीड लाख
कोको रिको हॉटेल- 71 हजार रुपये
मंत्री शंभुराज देसाई यांना केले लक्ष्य
पुण्यात दर १५ दिवसांनी गांजा आणि ड्रग्ज सापडत असेल तर उत्पादन शुल्क विभाग काय करतो आहे? संबंधित खात्याच्या अधिकामंत्र्याचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? अधिकारी त्यांचे आदेश ऐकत नाहीत का?, असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना लक्ष्य केले. आम्ही काही बोललो तर एक्साईज खात्याचे मंत्री आणि आरोग्य प्रशासन विभागाचे मंत्री आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा करतात. आमच्यावर केस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोला, असे खडेबोल सुषमा अंधारे यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावले.
रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. “महाराष्ट्रातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही तरुणाईला पोखरून काढत आहात. हा ड्रग्स कुठून सापडतो. अजय तावरेंना ललित पाटील प्रकरणातच अटक झाली पाहिजे होती. का त्यांना सोडलं जातं? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. तर, पुण्यातील अनधिकृत पब, बार आणि हॉटेल्सची यादीच धंगेकरांनी आणली होती. या यादीत प्रत्येकावर कारवाई केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत होता. परंतु धंगेकर आणि अंधारे कारवाई झालीच नसल्यावर ठाम होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिसांमध्ये बरीच बाचाबाची झाली.
“पाकीट संस्कृतीत अधिकारी अडकले आहेत. समाजातील मुले बरबाद होत आहेत हे दिसत नाही. त्यांची पाकीटसंस्कृती थांबली पाहिजे याकरता इथे आलो आहे. पुणेकरांची मुले सुरक्षित राहिली पाहिजे याचा विचार यांनी केला नाही तर आम्ही लोकशाहीपद्धतीने आंदोलन करू”, अशा इशाराही धंगेकरांनी दिला. वाचून दाखवलेल्या यादीतून तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे लिहिलेलं आहे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही”, असंही ते संतप्तपणे म्हणाले.
जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल
दरम्यान, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांचं बोलून झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “हे आरोप पूर्णतः चुकीचे आरोप आहेत. जिल्हाप्रमुख म्हणून अशा पद्धतीने कोठे काही होत असेल तर याबाबत मी चौकशी करेन. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार घेतल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून ८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या विभागाचा प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस पुणेकरांसाठी झगडत आहे. तुमचं जे स्वप्न आहे तेच आमचंही स्वप्न आहे. याबाबतीत ८ हजाराच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत. पब, बार, हॉटेलमालकावर कारवाई करण्याबाबत दुप्पट प्रकरणात वाढ झाली आहे. १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. २ परवाने कायमस्वरुपी बंद करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.