पुणे : टीव्ही नाईनचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निधन झाले. प्रामाणिक आणि सचोटीने अखेरपर्यंत वार्तांकन करणाऱ्या पांडुरंग रायकर यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार हरपला. अशावेळी त्यांना आधार देण्याच्या भावनेतून सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनने रायकर यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार एक लाखाचा पहिला धनादेश शुक्रवारी त्यांच्या पत्नी शीतल रायकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर अनेक संस्था, व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या होत्या. रायकर यांना पाच वर्षाचा एक मुलगा व अडीच वर्षाची मुलगी आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थेची सामाजिक जबाबदारी म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी तात्काळ रायकर यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन करणार असल्याचे जाहीर केले होते. समाजाला दिशा देणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचे असे दुर्दैवी निधन दुःखदायक असून, त्यांच्या कुटुंबियांसोबत सूर्यदत्ता परिवार कायम राहील, अशी भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत महिला महोत्सव (वुमेन मंथ) साजरा होत आहे. या कार्यक्रमात शीतल रायकर यांना ‘आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत’ असा विश्वास देऊन त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने निमंत्रित केले होते. ‘सूर्यदत्ता’च्या वतीने संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी रायकर यांचे कुटुंबीय, संस्थेचे संचालक प्रा. सुनील धाडीवाल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे व इतर महिला स्टाफ उपस्थित होता.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांसोबत सूर्यदत्ता परिवार कायम राहील. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत, तसेच ज्ञानार्थदान केले जाणार आहे. आज महिला दिनाच्या उत्सवानिमित्त एवढेच सांगेन की, शीतल रायकर यांनी सक्षमपणे उभे राहून आपल्या मुलांना चांगले घडवावे. या प्रवासात लागेल ते सहकार्य आम्ही करू. ‘सूर्यदत्ता’मध्ये या मुलांनी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तर तो पूर्णतः मोफत असेल.”
शीतल रायकर यांनी सूर्यदत्ता परिवाराचे आभार मानले. तसेच पांडुरंग रायकर यांच्याप्रती भावना व्यक्त करताना ‘माझे पती प्रामाणिक पत्रकारिता करत होते, म्हणूनच आज अनेक संस्था, व्यक्ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देत आहेत.’ सिद्धांत चोरडिया म्हणाले, “समाजातील सर्व संस्थांनी गरजवंतांना मदत देऊ केली, तर देशाचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल. शिक्षण हा मूलभूत अधिकार सर्वाना मिळेल, याचा प्रयत्न आपण करावा.”