स्मशानभूमीतील सेवासमिधा ‘सुनिताताई’

महाराष्ट्र लेख
Spread the love

श्रीकृष्ण कुलकर्णी, नाशिक

शेकडो वर्षांपासून  केवळ चूल आणि मूल एवढ्याच संकल्पनेशी  महिलांचा संबंध जोडला गेलेला आहे. पण आजची परिस्थिती बदलली असून महिला घराबाहेर पडून  वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत करत  आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत  बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. पद,बढती,प्रतिष्ठा आणि पुरेसा पैसाही महिलांना  मिळू लागल्याने त्या  कार्यरत असलेल्या क्षेत्रात रमतांना दिसत आहे. पण केवळ फळाची अपेक्षा न धरता सेवाभावीवृत्तीने न घाबरता,डगमगता एखादी स्त्री स्मशानातील अत्यंसंस्काराचे सर्व सोपस्कार पाडत असेल तर.!..विश्वास बसत नाही ना, पण खरंय नाशिकच्या सुनिता पाटील गेली २० वर्षे  अंत्यसंस्काराचे काम सेवावृत्तीने समिधा बनून करत आहेत.

 सुनिताताई या मूळच्या नाशिकच्याच. त्यांचे वडिल रामचंद्र हिरवे. या कुटुंबाची पंचवटी स्मशानभूमीच्या जवळ  लाकडाची वखार होती. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना  लाकडे व इंधन देणे हे त्यांचे काम. सुनिताबाई यांचा जन्म स्मशानाच्या ठिकाणी झाला आणि वाढल्याही त्याच  वातावरणात,पण त्यांची दृष्टी बोथट न होता उलट संवेदना जागी झाली. याच भागातील गणेश विद्यालय आणि नर्गिस दत्त कन्या विद्यालयात दहावीपर्यत त्यांनी शिक्षण घेतले. हिरवे कुटुंबाच्या किमान चार /  पाच पिढ्यांपासून हे काम केले जात आहे. पुढील काळात नाशिक महापालिकेने प्रेते दहन करण्यासाठी विनामूल्य लाकडे पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हिरवे कुटुंबाने स्मशानात येणाऱ्यां प्रेताचे सरण रचणे आणि अंतिम संस्कारासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. सध्या  याच हिरवे कुटुंबातील मुलगी सौ. सुनिता राजेंद्र पाटील अहोरात्र हा वसा चालवत आहे.

न डगमगता अहोरात्र मदतीसाठी पुढेच…

 स्मशानभूमी….एवढं नाव जरी कानावर पडलं तरी अनेकांच्या मनात धस्स होते. मृतदेहाजवळ आक्रोश करणारे नातलग, भडकणाऱ्या चिता आणि इतर वेळी भयाण शांतता अशा वातावरणातील स्मशानभूमीची सर्वांनाच भिती वाटते. अशा ठिकाणी सुनीता पाटील ही महिला मृतदेह स्वच्छ करणे, हाता-पायांना, तोंडाला तेल-तूप लावणे आणि त्या मृतदेहाला व्यवस्थित सरणावर ठेवण्याचे काम गेल्या वीस वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांनी अगदी तरुण वयात प्रथम एका पुरुषाचा अंतिम संस्कार विधिवत केला आणि पंधरा वीस वर्षात किमान पंधरा हजारांहून अधिक प्रेतांना तशीच स्वर्गाची वाट दाखवली. अजूनही अनेक समाजांतील महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही. मात्र, एक महिला असूनही मृतदेहाची सेवा करून अंतिम प्रवास सुकर करण्याचे काम त्या करीत आहेत. सुनिताताई या अंतिम सोहळ्यालाही आनंददायी करू पाहतात.

कुटूंबाची मोलाची साथ,टिकाटिप्पणीकडे दुर्लक्ष

प्रेतासाठी सरण रचण्यापासून तर सर्व संस्कारात सक्रीय सहभागी होणारी ही बाई घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करत असेल तर तिच्या हातचे कोण खात असेल? दिवसातून दहा दहा वेळा तिला अंघोळ करावी लागत असेल का? असा विचार करणारी माणसे सुनिता पाटील यांना रोजच भेटत असतात. काही स्त्रियांनी तर तिच्या पतीला विचारले  तुम्ही तिला घरात ठेवताच कसे?  पण पती त्याकडे दुर्लक्ष करतात, सुनिता ताई यांना  त्यांच्या कुटुंबाची पूर्ण साथ आहे. राजेंद्र पाटील पत्नीच्या स्मशानसेवेचा दुवा झालेले आहेत. सुनिता पाटील यांना दोन मुले आहेत आणि शिक्षणाबरोबरच ते आईच्या समाजसेवेत सहभागी होतात. मुले  सरण रचायलाही आईला मदत करतात. बाहेरून होणाऱ्या टिकाटिप्पणीकडे दुर्लक्ष करून एखाद्या सैनिकांप्रमाणे आपले काम सुरु ठेवणे यात त्यांना अधिक धन्यता वाटते.

सारे अनुभव थक्क करणारे

 स्मशानातील वातावरणाशी त्या समरस झाल्या, जवळच्या नातलगांनाही मृतदेहाची भीती वाटत असताना महिला असूनही त्यांना कधी भीती वाटली नाही. त्यांच्या मते माणसे जिवंतपणी त्रास देतात, मृत्यूनंतर नाही. मृतदेहाच्या सेवेतच खरे पुण्य गवसते. स्मशानभूमीत येणारे मृतदेह वेगवेगळ्या अवस्थेतील असतात. काही दुर्धर रोगाने, काही अपघाताने, काही जळून, काही पाण्यात बुडून, काही वृद्धापकाळाने, काही आत्महत्या करून मृत झालेले असतात. अशा कोणत्याही अवस्थेतील मृतदेह येत असतात. आजाराने, जळून, बुडून मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवाजवळ नातेवाईकही थांबत नाहीत. नाकाला रुमाल बांधून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न ते करतात. अशा अवस्थेतही सुनीताताई या हातात काही न घालता आणि तोंडाला रुमाल न बांधता मृतदेहांची सेवा करतात.

 स्मशानभूमीत कॅन्सरसारख्या आजाराचे आणि जळालेल्या अवस्थेतील रुग्ण आल्यानंतर त्यांची सेवा करणे अवघड काम असते. कॅन्सरने काहींचे गालच गेलेले असतात. जळालेल्या मृतदेहाला त्वचाच शिल्लक नसते, अशावेळी मालिश करता येणे शक्य नसते. पाण्यात बुडून सडलेल्या मृतदेहाचे तर अवयवच निघून हातात येण्याचे प्रसंगही घडल्याचे त्या सांगतात.

 कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार ……..  कुटुंब  हादरले.

लॉकडाऊनच्या काळात मध्यंतरी स्मशानभूमीत त्यांनी दोन मृतदेहांना तूप लावून त्यांचे अंत्यसंस्कार केले मात्र नातेवाईक लांब का उभे आहेत, याबाबत त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी न डगमगता मृतदेहावर अंत्यंस्कार करून दैनंदिन कामकाज सुरु केले मात्र दोन दिवसांनी मृत्यु दाखला आल्यानंतर दाखला पाहून सुनिताताई  हादरल्या. त्यावर मृत्युचे कोरोना हे  कारण स्पष्टपणे दिले होते. ते पाहून सुनिताताईंचे  सारे कुटुंबच हादरले,पण या प्रसंगातून त्यांनी सावध भूमिका घेत पुढील काळात मृत्यु दाखल्यावरील प्रमाणपत्राचे कारण तपासूनच अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. अंत्यंसस्कार करणे हे काही एकाचे काम नाही, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच इतरही चार पाच युवक त्यांना सेवाभावी वृत्तीने मदत करतात, महापालिका या सर्वांना कुठलीही मदत देत नाही,अथवा मानधनही देत नाही. अंत्यसंस्कारानंतर काही परिवारातील सदस्य स्वेच्छेने काही मदत यांना देतात तर काहीजण ही मदत आम्हाला देणेही टाळतात असे त्या आवर्जुन सांगतात.

 केवळ पैशासाठी नव्हे तर सेवाभावीपणे त्या  हे काम करतात.  त्या सेवाभावी कामातून मिळणारा  आशीर्वाद  त्यांना लाख मोलाचा वाटतो.  त्यांच्या सेवा कार्याची दखल अनेकांनी घेतली. त्यात राज्य शासनाच्या हिरकणी पुरस्कारासह त्यांना अटलसेवा गौरव पुरस्कार, सावित्रीबाई सन्मान आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

देवावर श्रध्दा अन् आत्मविश्वास

दोन कोरोनाबाधित रूग्णांवर अंत्यसंस्कारानंतर माझ्या मनात धडकी भरली होती, मात्र धोका पत्करून इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे काम केले. या दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करतांना नातेवाईक लांबूनच पाहत होते, त्यांच्या हातात सॅनिटायझरने भरलेले स्प्रे होते, ते सारखे हाताला मारत होते. माझ्या मनात आले हे रूग्ण तर कोरोनाचे नसावे ना,अखेर मृत्युचा दाखला आला त्यावेळी ते खरं ठरले. पण देवावरील श्रध्दा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मला आणि माझ्या कुटूंबाला काहीच झाले नाही.

सुनिता पाटील,पंचवटी अमरधाम, नाशिक

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *