पुणे(प्रतिनिधि)— राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार बुधवारी बारामतीमध्ये आमनेसामने आले. यावेळी युगेंद्र पवार यांनी नमस्कार करत खासदार सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांनी शास्त्री यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या अभिवादनावेळी बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. युगेंद्र पवारांनी सुनेत्रा पवार समोर आल्यानंतर राजकारणाचा कोणताही अडसर न ठेवता काकी सुनेत्रा पवार यांचा आशीर्वाद घेत संस्कृती जपली.
लोकसभा निवडणुकांवेळी पवार विरुद्ध सुळे असा राजकीय सामना रंगला होता. मात्र, तो सामना पवार विरुद्ध पवार असा काका विरुद्ध पुतण्या असाच होता. आता, बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण युगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावागावात युगेंद्र पवार जाऊन शरद पवार यांची भूमिका लोकांना समजून सांगत आहेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर युगेंद्र पवार आता मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.