पुणे – विवेक विचार मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सामाजिक अत्याचार व जातीय संघर्षाच्या घटनांच्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याविषयी अहवाल सादर केला. या वेळी झालेल्या चर्चेत राज्यपालांनी कायद्यासोबत प्रबोधन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्रातील जातीय संघर्ष अत्याचाराच्या गंभीर घटनांच्या संदर्भात विवेक विचार मंच द्वारे राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने ‘राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी या परिषदेला संबोधित केले.
या परिषदेत राज्यातील ११० संस्था संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनुसूचित जाती-जमाती व अन्य वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या समस्यांवर या परिषदेत चर्चा झाली. या अनुषंगाने सामाजिक न्याय परिषदेत दोन ठराव पारित करण्यात आले आणि सरकारकडे आवश्यक मागण्या करण्यात आल्या.