शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यसरकार देणार ५० कोटी रुपयांचा निधी : देवेंद्र फडणवीस

शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यसरकार देणार ५० कोटी रुपयांचा निधी
शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यसरकार देणार ५० कोटी रुपयांचा निधी

पुणे(प्रतिनिधि)–महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आणि पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेली शिवसृष्टी पाहून मी नि:शब्द झालो आहे. ही शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे एक केंद्र ठरणार असून, यातील पुढील टप्पे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टीने शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी आम्ही राज्य सरकारतर्फे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मी आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच आहोत त्यामुळे ही शिवसृष्टी पूर्ण व्हावी ही आम्हा सर्वांची इच्छा आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

शिवजयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या द्वितीय चरणाचा लोकार्पण समारंभ संपन्न झाला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय  सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च, तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील, राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, आमदार विजय शिवतारे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, अमृत पुरंदरे, डॉ विनय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अजित आपटे यांनी केले तर प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी आभार मानले.

अधिक वाचा  चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता : अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाषेचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले होते आणि म्हणूनच त्यांनी स्वराज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊ केला होता. त्या काळी अरबी, फारसी भाषेत चालणारा राज्यकारभार महाराजांनी मराठीमध्ये चालू केला होता. त्याकाळी महाराजांनी आज्ञापत्रे, राजकारभारातील अनेक शब्द देखील मराठीमध्ये आणले.”

लढवय्ये महाराज सर्वांनाच माहित आहेत, मात्र त्या पलीकडे जात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुरस्कार करणारे महाराज, पर्यावरणप्रेमी, युध्दकौशल्याचा अभ्यास असलेले महाराज, योग्य प्रशासक असलेले महाराज असे महाराजांचे अनेक पैलू पुढे आणण्याचे काम शिवसृष्टी नक्की करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिवसृष्टीला राज्य सरकारने महत्त्वाच्या पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असला तरी शिवसृष्टी हे निव्वळ एक पर्यटन केंद्र नसून छत्रपती शिवरायांवरील अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचे केंद्र आहे असे स्पष्ट मत फडणवीस यांनी मांडले.

अधिक वाचा  अरविंद एज्युकेशन सोसायटीतर्फे नवरात्रोत्सवात भोंडला, थुंकीमुक्त रस्ता अभियान,पर्यावरण जनजागृती 

राष्ट्राभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोवर तयार होत नाही तोवर देशाचा विकास होणार नाही हे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकास भी, विरासत भी’ ही संकल्पना देशासमोर मांडली. त्यालाच अनुसरून वारसा, विरासत जपणारी राष्ट्राभिमानी पिढी निर्माण व्हावी यासाठी शिवसृष्टी प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असे फडणवीस म्हणाले. आपला समाज आपला वैभवसंपन्न वारसा विसरला होता, तो लक्षात आणून देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. आता शिवसृष्टीच्या माध्यमातून आपण ते पुढील पिढीपर्यंत नेऊ असेही फडणवीस यांनी सांगितले.

मी देशविदेशात अनेक अॅम्युझमेंट प्रकल्पांना भेट दिली आहे मात्र शिवसृष्टीमध्ये जो विचार जी प्रेरणा मिळाली ती शब्दांत वर्णन करता येणार नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकल्पाला भेट दिली नाही तर तुम्ही स्वर्गीय आनंदाला मुकाला असे मला वाटते. देशातील आणि राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी.” आज साकारत असलेली ही शिवसृष्टी पाहून पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे हे देखील स्वर्गातून शुभाशीर्वाद देत असलील असे फडणवीस म्हणाले. ही शिवसृष्टी हे राष्ट्रकार्य आहे हीच भावना आमच्या मनात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एक ते दीड हजार वर्षांत आपणा सर्वांना स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा विसर पडला होता. आपले हजारो वर्षाचे स्वत्व यामुळे संपते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वत्व टिकविले आणि एकाच छताखाली शिवरायांची प्रेरणा मिळावी या कल्पनेतून बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टीची कल्पना मांडली असे गौरवोद्गार नाना जाधव यांनी काढले.

अधिक वाचा  मोहोळांच्या विजयासाठी ब्राह्मण संघटना एकवटल्या !

प्रास्ताविक करताना जगदीश कदम यांनी शिवसृष्टीमध्ये साकारण्यात आलेल्या आणि नजीकच्या भविष्यात साकारल्या जाणाऱ्या गोष्टींची माहिती उपस्थितांना दिली. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे रुपये ८७ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.

शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या गंगासागर तलावात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड या किल्ल्यावरून आणलेले पाणी आज मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथून पाठविलेल्या पाण्याचा कलश, तुळापूर त्रिवेणी संगमांवरील पाणी आणि नर्मदा नदीचे पाणी देखील यावेळी गंगासागरता अर्पण करण्यात आले. यापैकी रायगडावरील पाणी हे घोडेस्वरांनी आणले आहे हे विशेष.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love