पुणे(प्रतिनिधि)–मराठी साहित्यिक प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्यावरील “अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर” या चरित्र ग्रंथाचा इंग्रजी व हिंदी अनुवाद असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
येत्या १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११. ३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवास राव, डॉ. श्रीपाल सबनीस तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा व कार्यक्रमाचे आयोजक भगवानराव वैराट हेही यावेळी उपस्थित असणार आहेत.
पाटील यांनी मराठीत लिहिलेल्या “अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान” या चरित्र ग्रंथांची देशपातळीवर साहित्यिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर नोंद घेतली गेली आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध वाणी प्रकाशनने नुकताच हा ग्रंथ हिंदीमध्येही प्रकाशित केलेला आहे. अण्णाभाऊंचे विशेषत: दलित साहित्यातील मोठे योगदान आणि त्यांनी आपल्या साहित्याद्वारे विविध स्तरातील भारतीय स्त्री जगताच्या मांडलेल्या व्यथा आणि वेदना यामुळे हा ग्रंथ संशोधन व वाचनाच्या अंगाने कमालीचा लोकप्रिय ठरलेला आहे. राजहंस प्रकाशनने मराठीत प्रकाशित केलेल्या या ग्रंथाच्या तीन आवृत्या आधीच प्रकाशित झालेल्या आहेत. पुणे विद्यापीठासह अनेक पुरस्कार या ग्रंथास लाभलेले आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळातील अण्णाभाऊंचे साहित्यातील राष्ट्रीय योगदान अधोरेखित करणारा हा ग्रंथ इंग्रजीमध्ये दिल्लीच्या केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे. अण्णाभाऊंचे वादळी जीवन आणि वैश्विक दर्जाचे लेखन लक्षात घेऊन त्यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा किताब देऊन गौरवावे अशी महाराष्ट्रातील दलित व कामगार चळवळीत काम करणाऱ्या जनतेची मोठी मागणी आहे. या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाच्या प्रकाशनाने या मागणीस पुष्टी मिळेल असे वाटते.
अण्णाभाऊंच्या क्रांतिकार्याची खास नोंद घेणाऱ्या या ग्रंथाच्या प्रकाशनाचे नियोजन महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी विशेष पुढाकार घेऊन केलेले आहे. सदरील कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त पुणेकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली असे आवाहन कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट व आंबेडकर चळवळीचे नेते महेश शिंदे यांनी केले आहे.