स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे


पुणे-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत  इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी  देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.    

 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे उपस्थित होते.

सव्वालाखे म्हणाल्या, काँग्रेसकडे महिला नेतृत्व नाही, या म्हणण्यात तथ्य नाही.  यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे या महिलांचे सक्षमपणे नेतृत्व करीत आहेत. पक्षात अनेक सक्षम चेहरे आहेत.  त्यांना आगामी काळात निश्चित संधी देऊ. त्याकरिता प्रामुख्याने निवडून येण्याची क्षमता हा निकष विचारात घेतला जाईल. महिलांना शासकीय कमिट्या मिळाव्यात, यासाठीही महिला काँग्रेसचा प्रयत्न असेल.

अधिक वाचा  शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये नको: अ.भा. किसान संघर्ष समन्वय समितीचा ५ नोव्हेंबरला रास्ता रोको

महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारल्यापासून महिलांची खंबीर  साथ मिळत आहे. कोविड काळात महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून उल्लेखनीय  काम केले आहे. त्याचबरोबर  एक गाव कोरोनामुक्त हा उपक्रम राबविला. बालविवाह रोखण्यासाठीही महिला काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. तसेच महिला अत्याचाराविरोधात हेल्पलाईन व लीगल सेल सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला काँगेसच्या स्थितीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, महिला काँग्रेस क्षीण झालेली नाही. आम्ही अनेक प्रश्नांवर आंदोलने केली. महागाईच्या प्रश्नावरही आम्ही आक्रमक आहोत. पदभार घेतल्यापासून 6 आंदोलने झाली.  दरवाढीविरोधातील आंदोलन यापुढे सुरूच असेल. पक्षाचे संघटन मजबूतच असून आता जिल्हानिहाय  बैठका घेऊन ते अधिक मजबूत करीत आहोत. आता उच्चशिक्षित महिलाही पक्षाशी जोडल्या जात आहे. महिलांना यापुढे अधिकाधिक सामावून घेतले जाईल.

अधिक वाचा  राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही... का म्हणाले असे संजय राऊत?

परिवर्तन होत असते. मात्र पुढे काँगेसशिवाय पर्याय नसेल, असे सांगतानाच स्वबळाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही सव्वालाखे यांनी सांगितले. आम्ही कुणावर पर्सनल टीका करीत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love