Sarod tunes and vocally rich singing became the hallmark of Sawai's later years

सरोदचे सूर आणि स्वरसमृद्ध गायन ठरले सवाई’च्या उत्तरार्धाचे मानकरी : पं. तेजेंद्र मुजुमदार आणि पं. कशाळकर यांचे रंगतदार सादरीकरण

कला-संस्कृती पुणे-मुंबई
Spread the love

Sawai Gandharav Bhimsen Sangit Mahotsav -सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध सरोदचे सूर आणि पं. कशाळकर (Pandit Kashalkar) यांच्या सिद्ध गायकीने रंगतदार ठरला. (Sarod tunes and vocally rich singing became the hallmark of Sawai’s later years)

पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार (Pt. Tejendra Narayan Mujumdar) यांनी आपल्या धीरगंभीर सरोदवादनाने ‘सवाई’ च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले. आलाप, जोड, झाला या पारंपरिक क्रमाने त्यांनी राग जयजयवंतीची खुलावट केली. विलंबित त्रितालातील त्यांचे वादन जणू ‘जयजयवंती’ च्या कॅनव्हासवर रागवाचक स्वराकृती चितारत होते. त्यानंतर झपताल आणि द्रुत त्रितालातील वादनात त्यांनी लयकारीचे उत्तम दर्शन घडवले. सरोद आणि तबल्याची सवाल जवाबांची जुगलबंदीही रंगली.

‘सवाई’ च्या पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर (Pt. Uhlas kashalkar) यांच्या स्वरसमृद्ध गायनाने झाली. राग दरबारीचे गंभीर सूर स्वरमंडपात निनादताच, रसिकांनी भरभरून दाद दिली. विलंबित तिलवाडा तालात निबद्ध ‘दुलहन आज बनी’  या रचनेच्या माध्यमातून पं. कशाळकर यांनी दरबारीचे राजस रूप उलगडत नेले. द्रुत बंदिशीत त्यांनी तबल्याच्या साथीने लयकारीचे वैविध्यपूर्ण आविष्कार दर्शवले.

त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची तर सुधीर नायक यांनी संवादिनीची रंगत वाढविणारी साथसंगत केली. ‘वसंत’ मधील ‘फूली बनी बेलरिया’ आणि ‘फगवा ब्रिज देखन को चलो री’ या रचनांतून ऋतूदर्शक बदलांचे यथार्थ वर्णन त्यांनी स्वराकृतींतून रसिकांना घडवले. तराणा सादर करून ‘तुम हो जगत के दाता’ या भैरवीने त्यांनी गायनाची सांगता केली. अद्वैत केसकर आणि ऐश्वर्य महाशब्दे यांनी तानपुरा आणि स्वरसाथ साथ केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *