स्वरमय वातावरणात ‘सवाई गंधर्व’चा प्रारंभ

कला-संस्कृती पुणे-मुंबई
Spread the love

Sawai Gandharva Bhimsen Sangit Mahotsav  : उतरत्या मध्यान्ही स्वरमय वातावरणात बुधवारी ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला (Sawai Gandharva Bhimsen Sangit Mahotsav ) दिमाखदार प्रारंभ झाला. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर(Tukaram Daithankar)  यांच्या सनई वादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरवात केली. मोजक्या स्वरावलींतून रागरूप मांडून त्यांनी दाद मिळवली. त्यांना तबला – कार्तिक स्वामी, निखिल तुकाराम दैठणकर सनई सहवादन, सूरपेटी – गणेश दैठणकर, तानपुरा – केतकी दैठणकर आणि मयुरी दैठणकर यांनी साथसंगत केली. ‘वैष्णव जन तो’ या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली. (Beginning of ‘Sawai Gandharva’ in a vocal atmosphere)

यानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील ‘अब तो बडी देर’ या रचनेतून केली. रागवाचक आलापीतून भीमपलासचा स्वरविस्तार त्यांनी उत्तम मांडला. त्याला जोडून द्रुत त्रितालात ‘बीरज मे धूम मचाए शाम’ ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. ‘माझे माहेर पंढरी’ या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. त्यांना संवादिनी शांतीभूषण देशपांडे,  तबला रोहन पंढरपूरकर, तानपुरा –  प्रसाद कुलकर्णी  व ऋत्विक हिर्लेकर, पखवाज माऊली फाटक, सारंगी फारुख लतिफ खान तर गायनसाथ दिनेश माझिरे यांनी केली.

‘सवाई’ च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व(Pandit Kumar Gandharva) यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली (Kalapani  Komkali ) यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले. समयानुकूल अशा राग पूरियाधनाश्री मध्ये कलापिनी यांनी विलंबित एकतालात ख्यालाची मांडणी साधली. दोन्ही रचना पं. कुमार गंधर्व यांच्या होत्या. ‘आजरा दिन डूबा’ या बंदिशीतून सायंकालीन वातावरण मूर्तिमंत उभे राहिले. ‘ मृगनयनी तेरो यार री’ ही रचना अतिशय ढंगदारपणे त्यांनी पेश केली. त्यानंतर राग हमीर मध्ये त्रितालात त्यांनी आक्रमक तानांचे पॅटर्न घेत हा उत्तरांप्रधान राग मोजक्या वेळात ‘कैसे घर जाऊ लंगरवा’ या रचनेतून खुलवला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली ‘सुनता है गुरु ग्यानी’ ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी अनुरूप साथसंगत केली. तानपुरा साथ वत्सल कपाळे आणि वैदेही अवधानी यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *