पुणे(प्रतिनिधि)— बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात ज्यांनी आंदोलने केली, त्यांनी ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आऱोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांना पुढे करण्यात आले त्यानंतर आता मात्र भाजपने धसांचाच पत्ता कापला असल्याचं समोर आलं आहे असेही ते म्हणाले.
बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी दोनदा गुप्त भेट घेतली असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाने वेगळंच वळण घेतले आहे. या भेटीनंतर विरोधकांकडून धस यांच्यावर जोरदार टीका होत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणांमध्ये वेगळाच कट झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बीड प्रकरणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, संतोष देशमुख यांचे कुटुंब मला भेटायला आलं होतं. तेव्हा मी विचारलं होतं की तुम्ही एफआयआर दाखल केला आहे का? तर त्यांनी तक्रार केली नव्हती. मी त्यांना सल्ला दिला की, तुम्हाला जे जे आरोपी वाटत आहे. त्या संदर्भात तुम्ही एफ आय आर दाखल करा त्यानंतर मग त्यांनी एफआयआर दाखल केला आहे.
एफआयआर मधली संशयित आरोपींची नावे पुढे आल्याशिवाय कायदेशीर कारवाई करता येत नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबाचा एफआयआर महत्वाचा आहे. मात्र माझा असा आरोप आहे की, ज्यांनी या प्रकरणासंदर्भात आंदोलने केली, त्यांनी ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आऱोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
घोटाळ्यासह इतर प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा सातत्याने मागितला जात आहे. मात्र आरोप सिद्ध झाले तर मुंडेंनी राजीनामा दिला तर योग्य होईल. तसेच अंजली दमानिया यांनी त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते कोर्टात सादर करावे, असे देखील आंबेडकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये दोघांमध्ये घमासान सुरू आहे. यात दुमत नाही. कुरघोडी करायचा प्रयत्न सुरू आहे. परंतु हे कुठपर्यंत चालेल ते सांगता येत नसल्याचं आंबेडकर म्हणाले.
आम्ही अशा बांडगुळांकडे कधी लक्ष देत नाही
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यातील अनेक संघटना आक्रमक होत,राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
मात्र, राहुल सोलापूरकर यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. याबाबत बोलताना आंबेडकर यांनी, अशी बांडगूळं खूप आहेत. त्यामुळे आम्ही अशा बांडगुळांकडे कधी लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया दिली.