पुणे – ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’ कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाले. त्यात ३०० हून अधिक बाल व युवा कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये ; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, सिंथेसायझर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तीगीत, चित्रपटगीते, सुगम संगीत, पाश्चिमात्य नृत्य अशा वैविध्यपूर्ण कला प्रकारांनी सारे भवन भारून गेले होते.
युवा व नवोदित कलाकारांसाठी पुणे फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून याचे संयोजन रवींद्र दुर्वे यांनी केले आहे. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष आहे.
७ ते १५ वर्षे वयोगटातील उगवते कलाकार व १६ ते २८ वर्षे वयोगटातील युवा कलाकार यांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमात ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’ कार्यक्रमाचे प्रख्यात नृत्यांगना नुपूर दैठणकर यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हल उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड अभय छाजेड, पदाधिकारी अतुल गोंजारी , मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी कृष्णकुमार गोयल म्हणाले की, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी उगवत्या व युवा कलाकारांसाठी असे व्यासपीठ सुरु केले. त्यामुळे अनेक कलाकार घडण्यास मदत झाली. अॅड अभय छाजेड म्हणाले की,
सुरेश कलमाडी यांच्या या उपक्रमाचे अनेक ठिकाणी अनुकरण झाले असून एक प्रकारे हा प्रज्ञाशोधच आहे. या कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सर्वांचे याप्रसंगी स्वागत केले व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. अतुल गोंजारी यांनी आभार मानले.
३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प,नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.