पुणे – केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी भूस्खलनामुळे 300 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सैन्य, एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य चालू असून, सेवा भारतीच्या वतीनेही अन्नधान्य वाटपापासून ते अत्यंसंस्कारापर्यंतची विविध मदतकार्य केली जात आहे. मदतकार्य सुरु असताना नागरिकांना वाचवत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रजीश आणि सारथ या दोन स्वयंसेवकांना आपले प्राण गमवावे लागले.
वायनाडच्या मुंडक्काई आणि चूरलमला या गावांतील संपूर्ण वस्तीच ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. एनडीआरएफच्या मदतीने सेवा भारती कडून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. मृतदेहांचा शोध आणि अंत्यविधीसाठी सेवा भारतीच्या वतीने 12 मोबाईल शववाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 37 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शोध आणि बचावाच्या पलीकडे रुग्णवाहिका, अन्न वितरण, वैद्यकीय सहाय्य आणि रक्तदानासाठी सेवा भारती कार्यरत आहे. यासाठी 651 स्वयंसेवक कार्यरत असून, भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या 10 ठिकाणी मदतकार्य सुरु आहे. वायनाडच्या गोडल्लाइकुन्नू, कारिया बिल्डिंग, कलपेट्टा येथे मदत संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (#RSS) उत्तर प्रांत सेवा प्रमुख एम.सी वाल्थसन आणि सेवा भारतीचे जिल्हा कार्यकर्ता देसीया तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत.
मदतकार्य दृष्टीक्षेपात –
- चूरलामा परिसरात मृतदेहांवरी अंत्यसंस्कारासाठी स्वयंसेवक कार्यरत
- ढिगाऱ्याखालून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम
- अन्नाची पाकीटे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
- बाधित परिरात 10 ठिकाणी मदत केंद्र
- लष्कराने पूल बांधल्यानंतर मदतकार्याला वेग