पुणे(प्रतिनिधी)-शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, पुणे महानगरपालिकेने यावर कठोर पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शहरातील १३ शाळांची यादी जाहीर केली असून या सर्व शाळा ‘बोगस’ असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाने आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नयेत, असे कळकळीचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या १३ शाळांना शासन स्तरावर कोणतीही अधिकृत मान्यता मिळालेली नाही. अशा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा इशारा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. पालकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये आणि आपल्या मुलांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या शाळांकडे पाठ फिरवावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या आहेत पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळा:
या बोगस शाळांच्या यादीत शहरातील विविध भागांतील शाळांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने:
बिबवेवाडी: न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल
येरवडा: महात्मा गांधी प्रशाला
हडपसर: एमनल पब्लिक स्कूल आणि ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल
कोंढवा खुर्द: तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब
कोंढवा बुद्रुक: सेंट झेविअर इंटरनॅशनल स्कूल, लेगसी हायस्कूल आणि शिवली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल
लोहगाव: आकांक्षा अकॅडमी स्कूल
उंड्री: आर्यन वर्ल्ड स्कूल, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल आणि ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, पुणे
एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन संचलित आर्यन पब्लिक स्कूल
विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाचा अशा प्रकारे ‘खेळखंडोबा’ सुरू असल्याने पालकांनी प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता तपासून पाहणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पुणे महापालिकेने ही यादी प्रसिद्ध करून पालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.















