Bajaj Pune Grand Tour 2026 : दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ (National Tourism Day) म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक (Cultural), ऐतिहासिक (Historical) आणि नैसर्गिक वारसा (Natural Heritage) जपणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख अधिक भक्कम करणे, हा यामागचा मूलभूत उद्देश आहे. पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नव्हे; तो संस्कृतीचा संवाद आहे, इतिहासाची ओळख आहे, निसर्गाशी नातं आहे आणि माणसांमधील संवेदनशील संबंधांचा सेतू आहे.
यावर्षी पुण्याच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत खास, अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण २३ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या अभूतपूर्व नियोजनाने यशस्वीरीत्या पार पडलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेने (International Cycling Competition) पुणे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला केवळ नवी दिशा दिली नाही, तर त्याला थेट जागतिक व्यासपीठावर नेण्याची ठोस पायाभरणी केली आहे. ही स्पर्धा क्रीडापुरती मर्यादित न राहता पुण्याच्या इतिहास, संस्कृती, निसर्ग, शेती, ग्रामीण जीवनशैली आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा एक भव्य जागतिक ‘शोकेस’ (Showcase) ठरणार आहे.
आजवर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर (Oxford of the East), आयटी हब (IT Hub), सांस्कृतिक राजधानी (Cultural Capital) आणि औद्योगिक केंद्र (Industrial Hub) म्हणून ओळखले जात होते. मात्र ‘पुणे ग्रँड टूर’नंतर पुण्याची ओळख एका ‘ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन’ (Global Tourism Destination) म्हणून ठामपणे आकार घेणार आहे. ही केवळ प्रतिमाबदलाची प्रक्रिया नसून, संपूर्ण पर्यटन अर्थव्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.
पुणे जिल्ह्याचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जगाच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. स्वराज्य उभारणीची गाथा, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय दूरदृष्टीत्व (Political Vision), छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, मावळ्यांचे पराक्रम, किल्ल्यांवरील संघर्ष आणि गनिमी काव्याची रणनिती …हे सारे इतिहासाचे अध्याय जागतिक पातळीवर अभ्यासले जातात. ‘ग्रँड टूर’च्या निमित्ताने हा इतिहास पुस्तकांपुरता न राहता प्रत्यक्ष भूप्रदेशावर अनुभवता येईल, अशा स्वरूपात जागतिक प्रेक्षकांसमोर पोहोचणार आहे.
पुरंदरचा वारसा हे याचे प्रभावी उदाहरण ठरणार आहे. पुरंदर (Purandar) म्हणजे केवळ एक किल्ला नव्हे, तर स्वराज्याच्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे Chatrapati Sambhaji Maharaj) जन्मस्थान असलेला हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrpati Shivaji Maharaj) आयुष्यातील अनेक निर्णायक घटनांचा साक्षीदार आहे. ‘पुणे ग्रँड टूर’ (Pune Grand Tour ) च्या मार्गामुळे हा भाग आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये (International Media), थेट प्रक्षेपणात आणि जागतिक पर्यटकांच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार आहे. परिणामी, पुरंदर हे केवळ इतिहासप्रेमींचेच नव्हे, तर जागतिक पर्यटकांचेही महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनेल.
भोर–वेल्हे (Bhor-Velhe) परिसरातील राजगड(Rahgad)…स्वराज्याची पहिली राजधानी (First Capital)…इतिहासात अढळ स्थान असलेला किल्ला आहे. जिथून स्वराज्याचे स्वप्न विस्तारले, जिथून प्रशासन, राजकारण आणि लष्करी धोरणांची सूत्रे हलली, तो राजगड आता जागतिक पर्यटनाच्या केंद्रस्थानी येणार आहे. राजगडाभोवतीचा सह्याद्रीचा निसर्ग, धुक्याची दुलई, घाटवाटा, धबधबे, डोंगररांगा आणि ऐतिहासिक पायवाटा…या साऱ्यांचा अनुभव ‘ग्रँड टूर’च्या निमित्ताने जगासमोर एकसंध स्वरूपात उभा राहणार आहे.
पुणे जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. पश्चिम घाटातील (Western Ghats) सह्याद्री पर्वतरांग, हिरव्या दऱ्या, घनदाट जंगलं, नद्या, धरणांचे जलाशय आणि शेतीप्रधान परिसर—या सगळ्यामुळे पुण्याला अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्य लाभले आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर, नीरा-देवघर, खडकवासला यांसारख्या धरणांचे विस्तीर्ण जलसाठे आणि त्यांच्या काठाने गेलेले सायकलिंग मार्ग पर्यटकांसाठी केवळ प्रवास न राहता एक दृश्यात्मक व भावनिक अनुभव घडवणार आहेत. निळ्या पाण्यावर उमटणारी सह्याद्रीची सावली, धरणकाठचा शांत परिसर आणि ग्रामीण जीवनशैलीचा साधेपणा पर्यटनाला नवा अर्थ देणार आहे.
याचबरोबर कृषी पर्यटन (Agri-Tourism) हा एक महत्त्वाचा आयाम पुढे येणार आहे. पुरंदरमधील जगप्रसिद्ध अंजीर आणि सीताफळे आता केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता पर्यटनाची ओळख बनणार आहेत. विदेशी पर्यटक थेट शेतावर जाऊन फळांची तोड, स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद, ग्रामीण जेवणाचा अनुभव आणि मातीचा गंध अनुभवू शकतील, अशी पोषक परिसंस्था (Ecosystem) उभी राहणार आहे. पर्यटन आता शहरकेंद्रित न राहता थेट शेतापर्यंत पोहोचणार आहे…हीच या बदलाची खरी ताकद आहे.
पर्यटनाचा कणा म्हणजे पायाभूत सुविधा
‘पुणे ग्रँड टूर’मुळे ही बाब केवळ चर्चेपुरती न राहता प्रत्यक्षात साकार होणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारेल, कनेक्टिव्हिटी (Connectivity) वाढेल. ऐतिहासिक किल्ले, धरणे, घाटवाटा, कृषी पर्यटन केंद्रे आणि निसर्गस्थळे अधिक सुलभपणे पोहोचण्याजोगी बनतील. ही भौतिक पायाभूत सुविधा म्हणजेच पर्यटन विकासाचा मजबूत पाया ठरेल. याचा सर्वाधिक सामाजिक-आर्थिक परिणाम (Socio-economic Impact) ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. होमस्टे संस्कृती (Homestay Culture), स्थानिक मार्गदर्शक, हस्तकला, स्थानिक खाद्यसंस्कृती (Local Cuisine), शेतीपूरक व्यवसाय, महिलांचे स्वयंसहायता गट (Self-Help Groups) आणि युवकांचे स्टार्टअप्स (Startups)…या सगळ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. एअर बीएनबीसारख्या प्लॅटफॉर्ममुळे अनेक नागरिकांना नवा व्यवसाय उभारण्याचे पाठबळ मिळेल. पर्यटन म्हणजे केवळ बाहेरून येणारा पैसा नाही, तर स्थानिक समाजरचनेला आत्मनिर्भर (Self-reliant) करणारे विकास मॉडेल (Development Model) ठरेल.
आजच्या राष्ट्रीय पर्यटन दिनी हे स्पष्टपणे जाणवते की पुणे जिल्हा आता केवळ शिक्षण, उद्योग किंवा आयटीपुरता मर्यादित राहणार नाही. इतिहास, निसर्ग, शेती, संस्कृती, आधुनिकता आणि जागतिक पर्यटन यांचा संगम असलेले एक समग्र केंद्र म्हणून पुणे उभे राहणार आहे. ‘पुणे ग्रँड टूर’ ही केवळ एक स्पर्धा नव्हती; ती पुण्याच्या पर्यटन विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड (Milestone) ठरणार आहे.
या स्पर्धेने रोवलेली मुहूर्तमेढ (Inception) आगामी काळात पुण्याच्या पर्यटनाला नव्या सुवर्णकाळात (Golden Era) घेऊन जाणार आहे. पुणे जिल्हा आता केवळ भारताचा पर्यटन नकाशा बदलणार नाही, तर जागतिक पर्यटन नकाशावर स्वतःची स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण करणार आहे. हे चित्र अत्यंत आश्वासक आहे. पुणेकरांनी ही संधी मनावर घेतली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे विकेंड पर्यटनाची मर्यादा दूर होऊन वर्षभर चालणारे पर्यटन सिझन (Tourism Season) निर्माण होणार आहे. आपण या पर्यटन उत्क्रांतीचे (Tourism Evolution) साक्षीदार आहोत…ही भावना मनाला प्रचंड आनंद देणारी आहे. भविष्यात ही गोष्ट आपण अत्यंत अभिमानाने मिरवत राहू, हे निश्चित…!!












