पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई: बनावट कॉल सेंटरवर छापा, अमेरिकन नागरिकांची लाखो डॉलर्सची फसवणूक उघड

बनावट कॉल सेंटरवर छापा
बनावट कॉल सेंटरवर छापा

पुणे(प्रतिनिधि)— पुणे शहर आणि सायबर पोलिसांनी खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर धडक कारवाई करत एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा शनिवारी पर्दाफाश केला. अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अटके’ची भीती दाखवून त्यांची फसवणूक या कॉल सेंटरमधून केली जात होती. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून सायबर पोलिसांनी घटनास्थळावरून ४१ मोबाईल, ६१लॅपटॉप आणि अनेक महत्त्वाचे डिजिटल साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या लॅपटॉपमधील डेटा तपासल्यानंतर या फसवणुकीसंबंधी आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर, आंतरराष्ट्रीय तक्रारींच्या आधारावर, खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावरील प्राईड आयकॉन इमारतीत टाकलेल्या छाप्यात लाखो अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांचा छापा; लॅपटॉपमध्ये आढळले अश्लील व्हिडिओ

ही कारवाई सुमारे दीडशे ते दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. पोलिसांनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावर सुरू असलेल्या मॅग्नेटल बी.पी.एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तिथे १२३ लोक उपस्थित होते, ज्यात १११ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. पोलिसांनी ११५ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे.

दररोज तीस ते चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट कॉल सेंटरमधून दररोज सुमारे १ लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळवला जात होता. अमेरिकन लोकांना लक्ष्य करून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. आरोपी बनावट पोलीस अधिकारी किंवा कायदेशीर सल्लागार असल्याचे भासवून त्यांना ‘डिजिटल अटके’ची भीती दाखवून धमकावत असत. यातून त्यांच्याकडून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे उकळले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट कॉल सेंटरमधून दररोज तीस ते चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक केली जात होती. हे कॉल सेंटर गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत होते.

अधिक वाचा  आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन क्रिकेट बुकींना अटक

या कॉल सेंटरमध्ये काम करणारे बहुतेक लोक आणि या घोटाळ्याचा सूत्रधार गुजरातचे आहेत. करण शेखावत हा मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. ताब्यात घेतलेल्या इतर १२३ हून अधिक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ४१ मोबाईल फोन, ६१ लॅपटॉप आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा जप्त केला आहे. जप्त केलेल्या लॅपटॉपमधील डेटा तपासून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे. या छाप्यानंतर सायबर फसवणुकीचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून त्यांचे आणखी कुठे लागेबांधे आहेत किंवा त्यांनी आणखी किती लोकांना फसवले याचा तपास करत आहेत. पुण्यातील ही कारवाई सायबर गुन्हेगारी विरोधातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love