पुणे – फेसबुकवर ‘बाय-बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ अशी पोस्ट टाकत पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय 45, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टवरुण त्यांनी नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल मेश्राम हे पुण्यातील नामांकित कमिन्स महाविद्यालयात प्राध्यापक होते. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याने फेसबुक अकाउंटवर ‘बाय-बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावात रस्त्यालगत असणार्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रफुल्ल मेश्राम यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट पाहून त्यांच्या मित्रांनी शोधाशोध सुरू केली. फेसबुकवरील लोकेशननुसार ते सासवड परिसरात असल्याचे समजल्यानंतर सासवड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता भिवरी येथील एका विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल या वस्तू दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी या विहिरीत शोधाशोध केली असता मेश्राम यांचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रफुल मेश्राम यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.