PMC Tax : मिळकतकर थकबाकीदारांसाठी ‘अभय योजने’चे शेवटचे दोन दिवस; महापालिकेकडून १८८ मिळकती सील

पुणे महानगरपालिका मिळकतकर अभय योजनेची शेवटची संधी
पुणे महानगरपालिका मिळकतकर अभय योजनेची शेवटची संधी

PMC Tax : पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मिळकतकर थकबाकीदारांसाठी दिलासादायक ठरलेल्या ‘अभय योजने’ची मुदत आता संपत आली असून, येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी योजनेचे अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर, जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन ७५ टक्के सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने शहरातील थकबाकीदारांसाठी ही विशेष अभय योजना सुरू केली होती, ज्यामध्ये थकीत करावरील व्याजाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेचा पहिला टप्पा १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत राबविण्यात आला होता. त्यानंतर नागरिकांच्या प्रतिसादाचा विचार करून प्रशासनाने या योजनेस १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी मुदतवाढ दिली होती. आता ही मुदत संपुष्टात येत असून, शनिवार दि. १४ फेब्रुवारी आणि रविवार दि. १५ फेब्रुवारी हे दोन दिवस नागरिकांसाठी अखेरची संधी असणार आहेत.

अधिक वाचा  पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची निवड

कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध आता कठोर पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण ८, नियम ४२ नुसार थकबाकीदार मिळकतींवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली असून, आजपर्यंत शहरात तब्बल १८८ मिळकती सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने अभय योजनेचा लाभ घेऊन आपल्या कराचा भरणा करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि शेवटच्या दिवसांमधील गर्दी लक्षात घेता, महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तरी, जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या संधीचा फायदा घेऊन स्वयंस्फूर्तीने थकीत कर भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन प्रमुख तथा उप आयुक्त रवी पवार यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love