PMC Property Tax Abhay Yojana: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC) क्षेत्रातील थकीत मिळकतकर (Property Tax) धारकांसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘अभय योजने’ला (Abhay Yojana) पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या विशेष सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी करदात्यांनी मोठी गर्दी केली असून, १२ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवसात महानगरपालिकेच्या तिजोरीत तब्बल ४९.१५ कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेची मुदत (Deadline) आता संपत आली असून, ७५ टक्के शास्ती माफीचा लाभ घेण्यासाठी केवळ ३ दिवस शिल्लक राहिले आहेत.
पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी (Residential), बिगरनिवासी (Commercial) आणि मोकळ्या जागांचा (Open Plots) कर वेळेत न भरल्यामुळे अनेक मालमत्ता धारकांकडे मोठी थकबाकी निर्माण झाली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार, थकीत करावर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जाते. ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीसाठी अभय योजना लागू केली आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कर आकारणी व कर संकलन विभागाने वसुलीवर विशेष लक्ष दिले आहे.
या योजनेमुळे महापालिकेच्या कर संकलनात (Tax Collection) ऐतिहासिक वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात अभय योजनेअंतर्गत आतापर्यंत ५७४.७९ कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेचे एकूण कर संकलन २३५८.१० कोटी रुपयांवर पोहोचले असून, मागील वर्षीचा ३१ मार्चचा विक्रमी आकडा यंदा जानेवारी महिन्यातच पार झाला आहे.
आता या योजनेचे केवळ ३ दिवस शिल्लक राहिले असून, १५ जानेवारी ही अंतिम तारीख आहे. उर्वरित कालावधीत सर्व थकीत करधारकांनी ७५ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन प्रमुख रवी पवार यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील नागरी सुविधा केंद्रे सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
















