आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गरजूंची रुग्णसेवा

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध प्रकारच्या आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. मोफत वैद्यकीय सेवा व विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून २ हजारहून अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी, मोफत श्रवण यंत्र वाटप, अपंग विकलांग व्यक्ती यांना मोफत जयपुरी कृत्रिम हात व पाय वाटप सुविधा, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, कॅन्सरग्रस्त रूग्णांना खाजगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीएशन अशा वैद्यकीय सुविधा व शिबीरे घेण्यात आली आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विश्वस्त व पदाधिकारी या शिबीरांच्या आयोजनात सहभाग घेत आहेत.  किडनी आजार रुग्णांकरीता मोफत डायलिसिस , किडनी स्टोन शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथी आणि हृदय आजार रुग्णांकरीता माफक दरात एंजिओग्राफी तपासणी, मोफत एंजोप्लास्टी, हृदय बायपास शस्त्रक्रिया, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एमआरआय, सीटी स्कॅन, एक्सरे सुविधा देणे सुरू आहे. विशेषत: लहान मुलांच्या शस्त्रक्रिया माफक व मोफत स्वरूपात खाजगी रुग्णालयाच्या वतीने करुन देण्यात आल्या.

उपक्रमात एम्स हॉस्पिटल, क्रिष्णा डायग्नोस्टिक सेंटर, सहयाद्री हॉस्पिटल, बालाजी आय क्लिनिक, व्हिजन नेक्स्ट हॉस्पीटल, मणिपाल हॉस्पीटल, इंद्रायणी हॉस्पीटल, ससून रुग्णालय, बुद्राणी हॉस्पीटल या सर्वांचे सहकार्य लाभत आहे. विविध वैद्यकिय सेवा दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने कायम स्वरुपी देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी सांगितले.

नुकतेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि बालाजी आय क्लिनिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक रुग्णांनी बालाजी आय क्लिनिक शुक्रवार पेठ येथे तपासणी करित सहभाग नोंदविला आणि याद्वारे ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियाची आवश्यकता आहे अशा रुग्णांची नेत्रतज्ञ डॉ. चित्रा सांबरे आणि डॉ. वैशाली ओक यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून देऊन संस्थेस सहकार्य केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *