पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय आज (२ एप्रिल) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसला तरी अंशत: लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील सात दिवस संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून पीएमपीएल बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत होती. त्यामुळेच आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.
याबाबत सौरभ राव म्हणाले, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेडची संख्या, चाचण्यांची सांख्य वाढवली जाईल. पुण्यामध्ये नगर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांतूनही रुग्ण उपचारासाठी पुण्यात येत आहेत. त्याचा ताण येथील आरोग्य यंत्रणेवर पडतो आहे असे सांगून राव म्हणाले, आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. 18 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करून देण्याची सूचना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दिवसाला 4 हजारांहून अधिक बधितांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. डब्लिंग रेट सुद्धा 49 दिवसांवर आला आहे. तर मृत्यू दर 1.95 टक्क्यांवर आहे. शहरात 35 हजार 849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच बरे होण्याचं प्रमाण 85 टक्क्यांवर आले आहे.
शहरात कोरोनाचा संसर्गात झपाट्याने वाढ होत असून सोसायटीच्या इमारतीत मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे शहरात एकूण 268 कंटेन्मेंट झोन तयार झाले असून यामध्ये 115 इमारती तर 111 सोसायटी यांचा समावेश आहे.
काय बंद राहणार?
सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल, धार्मिक स्थळं, पीएमपीएमएल बससेवा 7 दिवस बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील. आठवडे बाजारही बंद राहणार आहे.
लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत. संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असेल.
जिम सुरु राहणार
दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार असून शाळा महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत.