पुणे –पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान तर झाले आहेच परंतु वखारीतील कांद्यालाही पावसाचा फटका बसलाआहे. त्यामुळे वखारीतील कांदाही खराब होत आहे. त्यामुळे सध्या बाजारात एकूण आवकेत 80 टक्के कांदा हलक्या प्रतीचा आहे. तर केवळ 20 टक्के कांदा चांगल्या प्रतीचा आहे. 20 टक्के कांद्यालाच परराज्यातून मागणी होत आहे. त्यामुळे या कांद्याला अधिकचा भाव मिळत आहे आणि आवक घटल्याने 80 टक्के हलक्या प्रतीच्या कांद्यालाही ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. आणखी दीड महिना कांद्याचे भाव अधिक असणार असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर तेजीत आहेत. त्यातच चार दिवसांत शहरातील हॉटेल्स, खानावळी सुरू होणार आहेत. त्यामुळे मागणी आणखी वाढणार आहे. तसे झाल्यास घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याचा किलोचा भाव 50 रूपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. परिणामी किरकोळ बाजारातील कांद्याचे दर 60 ते 65 रूपयापर्यंत वाढू शकतात. येत्या आठवड्यात कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र अतिवृष्टीमुळे दोन्ही राज्यातील नवीन कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हंगाम लांबला आहे. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांद्याची आवक सुरू होईल. मात्र नवीन कांद्याला पावसाचा मार बसल्याने दर्जा खालावलेला असणार आहे. त्यामुळे आणखी सुमारे दीड महिना जुन्या कांद्याचे दर अधिक असणार आहेत. कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मुळातच बाजारात कांद्याची आवक वाढत नसल्याने भाव कडाडले आहेत. पुढच्या आठवड्यात त्यात आणखी भर पडणार असल्याचेही व्यापार्यांनी सांगितले.