मुंबई- राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाला प्रतिबंध करणारी लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण एक मे पासून होणार नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.टोपे यांनी जनतेला थोडं सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे.
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या १ मे रोजी राज्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
टोपे म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं . लसीच्या कमतरतेमुळं १ मे पासून लसीकरण शक्य नाही. १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.