पुणे-‘ मुसलमानांना देखील इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे, ते पण इथलेच आहेत की. त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे’, मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.
नाम फाउंडेशनच्या वतीने आज खडकवासल्या जवळच्या बहुली येथे आगीत जळालेली 16 घरे बांधून देण्यात आली आहेत. ही घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलीय. त्यावेळी नाना बोलत होते.
नाना पाटेकर म्हणाले कि, “सगळ्या गोष्टी सरकारच्या भरवशावर शक्य नाही. जे जमेल ते प्रत्येकाने करावं, असं सांगत काश्मीरमध्ये वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे.. ते ही आपलेच असून दोन तीन पिढ्यांपूर्वी ते कन्व्हर्ट झाले आहेत. सगळ्यांमधला माणूस शोधायला हवा, येणारा प्रत्येकजण हा जाणार आहे याच्यावर विश्वास ठेऊन चांगलं काम करायला हवं. संपत्तीचा किती संचय करणार आहोत आपण..एक दिवस जाणार आहोत यावर आपण कधी विश्वास ठेवणार आहोत. माझ्या सातबाऱ्यावर इतकं आहे, तितकं आहे… असं लोक सांगतात पण माझ्या सातबाऱ्यावर खूप लोकं आहेत, असं मी अभिमानाने सांगतो”, असंही नाना म्हणाले.
नाना पाटेकर म्हणाले, “आम्हाला घरं जळाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही या गावात आलो. पावसाळ्याच्या आधी ती घरं जळाली होती. मी त्यांना धीर दिला तुम्ही रडू नका, आपण दोन-तीन महिन्यात घरं बांधून घेऊ, असे त्यांना सांगितले होते”.“यावेळी सर्व पक्षाची मंडळी सोबत होती. चांगलं करायचं म्हटल्यावर सगळी माणसं सोबत असतात. पक्ष बाजूला ठेऊन सर्व लोक एकत्र येतात हे मला बरं वाटतं. मी कुठल्या पक्षाचा नाही. जो चांगल काम करतो त्याला नमस्कार करायचा आणि जो वाईट काम करतो त्यालाही नमस्कार करायचा,” असंही ते म्हणाले.
“नामला आतापर्यंत खूप लोकांनी पैसे दिले आहेत. लोकांना विश्वास आहे की नामला दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार होणार नाही. याची मला ग्वाही देण्याची गरज नाही किंबहुना पडणारही नाही, त्यांचे पैसे योग्य कामाला लागतात, हा लोकांना विश्वास वाटतो”, असं नाना म्हणाले.