पुणे— महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा अंदाज घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसं केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असं मत या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सध्या पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकारणात हालचाली दिसून येत आहेत. आगामी निवडणुकीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा तग धरुन आहे. युतीचा मनसेला निवडणुकांमध्ये चांगला फायदा होईल, असं मनसेसैनिकांचं म्हणणं आहे.
आगामी महानगपालिकेच्या निवडणुकांमुळे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्यानं पुणे दौऱ्यावर असल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी मनसेसैनिकांनी आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता राज ठाकरे याविषयी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पुणे दौऱ्यावर असताना महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार का, असं राज ठाकरे यांना विचारण्यात आलं होतं. यावर पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थितीनुसार घेऊ, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.