पुणे(प्रतिनिधि)- पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं सोमवारी भर चौकातून अपहरण करण्यात आलं आहे. टिळेकरांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आले आहे. एक चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, सासवड-पुणे रस्ता, हडपसर) हे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडले. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी वाघ यांना धमकाविले. वाघ यांना धमकावून मोटारीत बसवून अपहरणकर्ते सासवड रस्त्याने पसार झाले. त्यावेळी तेथून निघालेल्या एकाने ही घटना पाहिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
संबंधित घटना ही सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली. या गाडीतून दोन जण बाहेर आले. त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचित करण्याचं नाटक केलं. त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं आणि ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं? याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
बराच वेळ झाल्याने सतीश वाघ घरी आले नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मुलाने शोधाशोध केली. पण वडील मिळत नसल्याने त्यांनी हडपस पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली. या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी आणि त्यांची गाडी कैद झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आता पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.