पुणे(प्रतिनिधी)- पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी । तीर्थव्रत ।।
हा ध्यास…टाळ मृदंगाचा गजर.. ज्ञानोबा तुकोबा नामाचा जयघोष…अशा भारलेल्या वातावरणात लाखो वारकऱयांच्या मांदियाळीत व पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने आषाढी वारीसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, अशा शब्दांत ज्या आळंदीचे वर्णन केले जाते, त्या अलंकापुरीत जणू भक्तीचा सागरच लोटला होता. प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत एकवटले होते. त्यांच्या साक्षीनेच हा सोहळा रंगला. शनिवारी पहाटे चारला घंटानादाने आळंदी गाव जागा झाला. काकडा, अभिषेक, महापूजा, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. दुपारी प्रस्थान सोहळय़ाची तयारी सुरू झाली. माउलींच्या समाधीवर मुखवटा ठेवून तुळशीहार व गुलाबपुष्पांचा हार घालण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास रथापुढे व रथामागे असणाऱया मानाच्या दिंडयांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली. सर्व दिंडय़ा मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे पुढे सरकत होत्या. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात, खांद्यावर पताका घेत, विणा, टाळ मृदंगाच्या गजरात, डोईवर तुळशी वृंदावन घेत वारकऱयांनी मंदिरात प्रवेश केला. वीणा, टाळ मृदुंगाच्या गजराने माऊली, तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता. भक्तिरसात वारकरी भाविक न्हावून निघाले.
सायंकाळी चारच्या सुमारास पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळय़ाला सुरुवात झाली. श्रीगुरु हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती झाली. त्यानंतर माउली संस्थानतर्फे श्रींची आरती झाली. वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱयावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. चलपादुकांची विधिवत प्राणप्रति÷ा झाली. सर्वांच्या मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘माउली माउली’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ या नामाचा गजर सुरू होता. उत्तरोत्तर सोहळय़ाची रंगत वाढतच गेली. सोहळा चालू असताना दिंडय़ांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. त्यानंतर माउलींचे मानाचे दोन अश्व मंदिरात आले आणि सोहळा प्रफुल्लित झाला. त्यानंतर मंदिरातून पालखी बाहेर आली आणि वारकरी, भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ मृदंगाचा स्वर टीपेला पोहोचला. वारकरी नाचू, डोलू लागले. पालखी खांद्यावर घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. या उत्साही वातावरणातच पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाडय़ात दाखल झाली. प्रस्थान सोहळय़ासाठी यावषी 47 दिंडय़ांना देऊळवाडय़ात प्रवेश दिला गेला. प्रतिदिंडी 90 वारकरीच प्रस्थानासाठी मंदिरात येतील अशी व्यवस्था यंदा करण्यात आली होती.
इंदायणी नदी सुधार योजनेसाठी ८०० कोटीचा निधी : मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ानिमित्त आळंदी येथे माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. या बोलताना वेळी ते म्हणाले, इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतला आहे. इंद्रायणी नदी सुधार योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी सूचना आम्ही केली आहे. 800 कोटी रुपयांचे फंडिंगदेखील नदी सुधार योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहे. नदी सुधारणा हे नैतिक कर्तव्य असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांनी वारकऱयांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. सोहळय़ाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते.
असा पार पडला सोहळा…
पहाटे 4 वाजता घंटानाद
पहाटे 4:15 वाजता काकड आरती
पहाटे 4 :15 ते 5: 30 वाजता पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधारती
सकाळी 5 ते 9 वाजता श्रींच्या चलपादुकांवर भक्तांची महापूजा
सकाळी 6 ते 12 वाजता भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, कीर्तन, विणामंडप
दुपारी 12 ते 12:30 वाजता गाभारा स्वच्छता, समाधीवर पाणी घालणे आणि महानैवेद्य
दुपारी 12 वाजता भाविकांना समाधीचे दर्शन
सायंकाळी 5.45 वाजता पालखीचे प्रस्थान