पुणे – कोरोनाच्या संकटामुळे महिलांच्या रोजंदारीवरही मोठा परिणाम झाला आहे. गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात रोजंदारीची कामे करून आपल्या संसाराला हातभार लावण्याचे काम महिला करत असतात. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे ती कामेही हिरावली गेली आहे. अशा परिस्थितीत या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प दामिनी बहुउद्देशीय महीला संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दामिनी बहुउद्देशीय महीला संस्था आणि मानदेशी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिलांना मास्क शिलाई प्रशिक्षणाचा कार्यक्रम द्वारका पार्क याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा ६५ महिलांनी लाभ घेतला.
यावेळी बोलताना दामीनी संस्थेच्या संस्थापीका अध्यक्षा नंदा जाधव म्हणाल्या, महिलांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्याबरोबरच आर्थिक दृष्ट्याही सक्षम असायला पाहिजे. आताच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्वत्र अनिश्चितेचे वातावरण आहे. अशावेळी घरातील महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्या घराला या संकटातून वाचवण्यासाठी हातभार लाऊ शकते, हा या प्रशिक्षणामागचा उद्देश आहे. महिलांनी स्वयंरोजगार करताना बचतही केली पाहिजे असे त्या म्हणाल्या.
मानदेशी फाउंडेशनच्या पदाधिकारी शोभा साठे, रंजना कलशेट्टी, यांनी महिलांना मास्क शिलाईचे प्रशिक्षण दिले. यावेळी दामीनी संस्थेच्या पदाधिकारी संगीता पाटील, जयश्रीताई पवार, मनीशा चव्हाण, सपना जाधव, शोभा मोहोळकर, मनीशा निंबाळकर, अर्चना लवांडे, रत्नमाला आय्या आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन दामीनीच्या अध्यक्षा नंदाताई जाधव यांनी केले तर शोभा मोहोळकर यांनी आभार मानले.