पुणे—आपला अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा ठसा मराठी मनावर उमटवणारे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना तब्बल ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे मेसेज आल्याचे समोर आले आहे. मांजरेकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दादर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरु असून एका व्यक्तीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. अबू सालेम टोळीकडून ही धमकी आल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी (26 ऑगस्ट) खंडणीच्या धमकीचा फोन त्यांना आला. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने पावलं उचलत खंडणीखोराला लगेच अटक केली आहे. हा खंडणीखोर खेडमधल्या असल्याचं कळतं. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती याबाबत पोलीस तपास करीत आहेत.