पुणे(प्रतिनिधि)–काश्मिरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडले गेलेले आहे. तरी देखील पाकिस्तान हा कधीही शांत बसणारा देश नाही. तसेच बांगलादेशी घुसखोरी हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. आज ४ ते ५ कोटी बांगलादेशी भारतामध्ये आहेत. पश्चिम बंगालची २९ टक्के आणि आसामची ३४ टक्के लोकसंख्या बांगलादेशी आहे. सन २०२५ च्या आधी बंगालचा किंवा आसामचा मुख्यमंत्री बांगलादेशी व्यक्ती होऊ शकतो, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संस्थेच्या सभागृहात ६ व्या शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दहशतवाद्यांना पकडणा-या पुण्यातील पोलीस बालरफी शेख, अमोल नजन, प्रदीप चव्हाण, ज्ञानेश्वर पांचाळ, अनिकेत जमदाडे यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यावेळी उपस्थित होते. शिंदेशाही पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
हेमंत महाजन म्हणाले, देशाची सुरक्षा सैन्य किंवा पोलिसांवर अवलंबून ठेऊन चालणार नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीने सर्तक रहायला हवे. आता धोका हा आपल्या घरापर्यंत पोहोचला आहे. आंदोलने करुन कामे थांबवायची, हा अजेंडा आज अंतर्गत सुरक्षेंतर्गत राबविला जातो. देशांतर्गत शत्रूंच्या संख्येत आज वाढ होत आहे. सगळ्यांनी डोळे व कान उघडे ठेवायला हवे. प्रत्येकाने सैनिक म्हणून काम केले, तर आपण घर, गल्ली, शहर, राज्य व देश सुरक्षित ठेवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
समीर चव्हाण म्हणाले, पोलिसांना उत्तम काम करण्याची अशा पुरस्कारातून प्रेरणा मिळते. पोलीस किंवा सैन्यदल हेच फक्त शौर्य दाखवू शकतात असे नाही. तर, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात धैर्याने शौर्य दाखवीत काम करू शकतो. तसे काम प्रत्येकाने करायला हवे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, दहशतवाद्यांना पकडण्यापासून शहरात झालेल्या छोटया-मोठया आपत्तींमध्ये पोलिसांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना समाज सुरक्षेबाबत देखील अत्यंत जागरुकपणे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.
भारतीय सैन्यदल, पोलीस, अग्निशमन दल व पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत – केजी ते पदव्युत्तर शिक्षणात सवलत लागू
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने भारतीय सैन्य दल, पोलीस दल, अग्निशमन दल आणि पत्रकार यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. केजी ते पदव्युत्तर शिक्षणात सर्वच इयत्तांमध्ये ही सवलत देण्यात येणार आहे. देशाचे रक्षण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे रक्षण करून त्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम यांच्यामार्फत होत असते. त्यामुळे त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी स्विकारत त्यांना सर्व प्रकारच्या शिक्षण ५० टक्के सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती जाधवर ग्रुप आफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.