drug trafficking: पुण्यातील कुरकुंभ येथील कारखान्यात तयार होणार्या ड्रग्जला (मेफेड्रॉन) लंडनची बाजारपेठ मिळाली असल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करीचे लंडन कनेक्शन उघड केले आहे. आता पर्यंत पुण्यातून १४०० कोटींचे ७१८ किलो, दिल्ली येथून १९०० कोटींचे ९७० किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. असे सर्व मिळून पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक किंमतीचे मेफेड्रॉन जप्त केले आहे.
वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (४०, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसीया (३५, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (४०, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (४६,रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (४१ रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (३९) आणि संदीप कुमार (४२, दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांनाही ट्रान्झीट रिमांडद्वारे पुण्यातील न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मेफेड्रॉन जप्त केल्यानंतर विश्रांतवाडी येथून मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन जप्त केले. याचाच पुढे तपास करत असताना पोलिसांना कुरकुंभ येथील भिमाजी साबळे याच्या अर्थकेम लॅबरोटरीज या कारखान्या विषयी माहिती मिळाली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेफेड्रॉनचे उत्पादन होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी येथून तब्बल 683 किलो मेफेड्रॉन जप्त केले. त्याच वेळेला या कारखान्यातून देशातील अन्य ठिकाणीही या ड्रग्जचा पुरवठा झाल्याने त्या अनुषंगाने तपासत केला असता त्यामध्ये दिल्ली कनेक्शन उघड झाले. दिल्ली दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पुणे पोलिसांनी तब्बल 970 किलो मेफेड्रॉन जप्त केले. यावेळी दिवेश भुतीया आणि संदीप कुमार यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे हा ड्रग्जचा साठा पोलिसांना मिळाला आहे.
पुणे- दिल्ली व्हाया लंडनला ड्रग्जची तस्करी
दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आलेल्या दिवेश भुतीया आणि संदीप कुमार यांची कुरिअर कंपनी आहे. तसेच त्यांची दिल्लीत गोदामे आहेत. दोघांनी अन्न पुरवठा करण्याच्या नावाखाली विमानाद्वारे लंडनला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी केल्याचे निष्पन्न झाले आहे.