पु
णे(प्रतिनिधी)– गोव्यातून आलेल्या संशयित ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने सातारा-पुणे रस्त्यावर घातलेल्या छाप्यात एक कोटी २८ लाख एक हजार ६०० रुपये किमतीचा विदेशी मद्याचा ट्रक आणि मोबाईल असा एक कोटी ५१ लाख सहा हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सासवड पथकास गोपनीय माहिती मिळाली, की केवळ गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या मद्याची मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या तस्करी केली जात आहे. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विशेष मोहीम राबवून महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी खेड शिवापूरच्या हद्दीत हॉटेल जगदंबासमोर सातारा-पुणे रस्त्यावर १४ चाकी संशयित ट्रक थांबविण्यात आला. या ट्रक चालकाकडे संबंधित वाहनात काय आहे, याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने चौकशी केली. त्यावेळी वाहनचालकाने संशयितरीत्या उत्तरे दिली. वाहनात सौंदर्यप्रसाधने असल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर वाहन रस्त्याच्या बाजूस घेऊन तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनात गोवा राज्यात निर्मिती व विक्रीस असलेल्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९ हजार ६८० सीलबंद बाटल्या (१६६० बॉक्स), रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ६४८० सीलबंद बाटल्या (५४० बॉक्स) आढळून आल्या.
ट्रकचालक अटकेत
या कारवाईत भारत बेंझ कंपनीच्या ३७२३ आर मॉडेलचा १४ चाकी ट्रकदेखील जप्त करण्यात आला असून, ट्रक चालक सुनील चक्रवर्ती यास अटक कण्यात आली आहे. वाहन चालकाकडे मद्य वाहतुकीच्या संदर्भात कोणताही वाहतूक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. हा मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याचे आरोपीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार सासवड विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास प्रदीप मोहिते दुय्यम निरीक्षक हे करत आहेत.