पुणे : दिव्यांग, वयोवृध्द, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन लस देण्याचा आगळावेगळा उपक्रम पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने कसबा मतदार संघात सुरू करण्यात आला आहे. फिरत्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लस देण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.
फिरते लसीकरण केंद्र व कसबा मतदारसंघातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशालेच्या प्रांगणात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपक्रमाचे आयोजक व पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, दीपक पोटे, सुशील मेंगडे, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, अर्चना पाटील, कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, अनिल बेलकर, विनायक आंबेकर उपस्थित होते.
दिनांक २० जून पर्यंत सुमारे ६ हजार २०० घरांमध्ये जाऊन लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविड काळात आर्थिक आणि आरोग्यविषयक मदतीची समाजामध्ये मोठी गरज आहे. नगरसेवक हेमंत रासने यांच्या पुढाकाराने दिव्यांग, वयोवृध्द, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन लस देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
हेमंत रासने म्हणाले, घरात येऊ लस देऊ… या उपक्रमाअंतर्गत लसीकरण करणा-या ३ गाडया कसबा मतदार संघामध्ये फिरणार आहेत. त्यामध्ये लसीकरणाशी संबंधित सर्व साहित्य, सुविधा व डॉक्टरांची टीम असणार आहे. या उपक्रमामुळे ज्यांना घराबाहेर पडणे शक्य नाही, अशा नागरिकांची सोय होणार आहे.
नगरसेवक सरस्वती शेंडगे, गणेश बिडकर, राजेश येनपुरे, धीरज घाटे, अर्चना पाटील, गायत्री खडके, योगेश समेळ, अजय खेडेकर, सम्राट थोरात, स्मिता वस्ते, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, मनीषा लडकत, सुलोचना कोंढरे या भाजपा कसबा मतदार संघातील सर्व नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही हेमंत रासने यांनी केले आहे.