🚩 क्रांतिवीर लहुजी वस्ताद 🚩 (१७ फेब्रुवारी १८८१)


क्रांतिकारक लहुजी राघोजी साळवे (राऊत) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.

पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवें यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच धारातीर्थी पडले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.

अधिक वाचा  #SSC Exam Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून(दि.३१ जानेवारी) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार

या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.

आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी गंज पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

अधिक वाचा  हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात रंगले 'बॅनर वॉर' : हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.

योगायोग म्हणजे वासुदेव बळवंत फडके ह्यांचेही निधन एडनच्या तुरुंगात लहुजी वस्तादांच्या निधनादिवशीच (१७ फेब्रुवारी १८८१) झाले. गुरु-शिष्य जोडी बरोबरच निजधामास निघून गेले.

क्रांतिवीर लहुजी वस्तादांना विनम्र अभिवादन !!!

– प्रसन्न खरे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love