महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. अनाठायी प्रथा, अंधश्रद्धा यांचे समाजमनावरील दडपण दूर करायचे काम या संतांनी केले.त्यातीलच एक कर्मनिष्ठ संत सावतामाळी होत.
पंढरपूर जवळील अरण हे त्यांचे गाव. ते संत ज्ञानदेव, नामदेव यांचे समकालीन होते. त्यांनी केलेल्या अभंग रचना म्हणजे प्रपंच कसा करावा म्हणजे परमार्थ साधता येईल याची शिकवण आहे. सावताने आपल्या उद्योगधंद्यात पांडुरंग पाहिला.
सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा।
कांदा मुळा या त्यांच्या प्रसिद्ध अभंगात ते म्हणतात मी माझ्या पिकविलेल्या भाजीत विठ्ठल पाहिला. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोट आदि साधनात विठ्ठल पाहिला. माझ्या कामधंदा मनापासून केला पण गळ्यात विठ्ठल गोवला. आपण एखादी गोष्ट गोवतो म्हणजे कायमस्वरूपी ठेवतो. विठ्ठल नामस्मरण कायम केले तर वाईट आचार, विचार आपोआपच दूर जातात. आधी केले मग सांगितले. या उक्तीप्रमाणे त्यांनी मी काय केले ते सांगितले.
स्वकर्मात व्हावे रत,
मोक्ष मिळे हातोहात।
सावत्याने केला मळा,
विठ्ठल देखियला डोळा।
स्वतःचे कामात रहावे. कामातच मोक्ष सहजासहजी मिळतो. हे मी स्वानुभवातून सांगतो. मला मळ्यात काम करता करताच विठ्ठल भैटला. ते शेतीची कामे करत. वारीला जाणारे वारकरी भेटत. त्यांना जेवण पाणी सारे देत. विचारपूस अत्यंत प्रेमाने करत. पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा असे म्हणत. लोकही आश्चर्य करीत एवढ्या जवळ पंढरपूर असुन हे वारीला का जात नसतील.
ते लोकांना सांगतात,योग,याग,तप, धर्म याची गरज नाही. फक्त नामस्मरणात शक्ती आहे. तेवढे मनापासून करावे. समयासी सादर व्हावे,देवे ठेविले तैसे रहावे। या अभंगात ते दिवस काही सारखे नसतात. सुख दुःख पाठोपाठ येते. आलेल्या प्रसंगाला देवाची इच्छा आहे. असे समजून सामोरे जावे. निर्विकार रितीने नामस्मरण करीत रहावे. कधीतरी आपल्यावर कृपा होईल आणि जन्ममरणाचा फेरा चुकेल असा विचार करावा.
त्यांनी विठ्ठलाच्या रुपाचे वर्णन अत्यंत साजिरे , यथार्थ केले आहे. कलीयुगात नामरुपातच विठ्ठल पहावा. नामस्मरणाने हृदयातील देव सिध्द करावा.तिथेच सावळी सुंदर विठ्ठल मुर्ती प्रतिष्ठावी. तिची आराधना नामानेच करावी. आता तिच्याकडे मागणे किती सुरेख मागतात पहा बरे सावता,
मागणे हे आम्हा नाही हो कोणासी,आठवावे संतांसी हे खरे
नेहमी सज्जनांचे,संतांचे सानिध्य लाभो. मार्गापासून विचलित होऊ नये म्हणून सावता योग्य संगत मागतात. कोणतेही सुख मागत नाहीत. अक्षय सुख कशातुन मिळते याची त्यांना पुरी जाणीव होती. असा हा सावता आपल्या कर्मयोगाच्या बळावर म्हणतो.
वैकुंठीचा देव आणु या कीर्तनी,
विठ्ठल गाऊनी नाचो रंगी।
खरोखरीच आपल्या भक्तीच्या,कर्माच्या,सत्संगाच्या जोरावर सावत्याने विठ्ठलाला घरी बोलावले. आषाढी एकादशी निमित्त सारे संत पांडुरंग भेटीसाठी पंढरपुरी जातात पण आषाडी अमावस्येला विठ्ठल पालखी घेऊन अरण गावी जातो. सावताची पुण्यतिथी आषाढ चतुर्दशीला असते. काला अमावस्येला असतो. केवढे थोर भाग्य सावता माळ्याचे पहा.
आपणही त्याचा कर्मयोग साध्य करता येतो का ते पाहु.
गीताग्रजा
(डॉ वैशाली काळे-गलांडे)