तथाकथित वैज्ञानिक, अंधश्रद्धा आणि अविश्वासाच्या जोखडात भारतीय संशोधन अडकून पडले – डॉ. राजेंद्र जगदाळे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– तथाकथित वैज्ञानिक, नोकरशहा आणि काही राजकीय नेतृत्व हेच भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनावर विश्वास ठेवत नसल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रज्ञ जे संशोधन करीत असतात त्यापासून समाज वंचित राहतो. तथाकथित वैज्ञानिक, अंधश्रद्धा आणि अविश्वासाच्या जोखडात भारतीय संशोधन अडकून पडल्याची खंत भारत सरकारच्या सायन्स अँँड टेक्नॉलॉजी पार्कचे मुख्य संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केली.

येथील दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँँड इंडस्ट्रीज, पुणे (डिकाई), अवनि आणि रिसर्च अँँड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन (रांचो) यांच्या संयुक्त विद्यमाने सर सी.व्ही. रमण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. राजेंद्र जगदाळे बोलत होते. आत्मनिर्भर भारत सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पी.ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, डिकाई आणि रांचोचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ येमूल गुरूजी, पी.ई. सोसायटी, पुणेच्या उपसचिव आणि नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात, एसजीएम ग्रुपचे संचालक रमेश पाटील, बारामतीचे अतिरीक्त आयुक्त अधीक्षक मिलिंद मोहिते, राजेंद्र झुंजारराव पाटील उपस्थित होते.

ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. विठ्ठल बांदल, दिव्यांगता सहायता केंद्राचे संशोधक व समन्वयक धनंजय भोळे, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक व्ही.एम. कुलकर्णी आणि युवा संशोधक अंकिता नगरकर यांना सर सी.व्ही. रमण संशोधन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले की, मूळ भारतीय विद्यार्थी सिलीकॉन व्हॅलीत गेल्यानंतरच त्यांचे कर्तृत्व का सिद्ध होते हा आत्मचिंतनाचा विषय आहे. भारतात शास्त्रज्ञांना संशोधनाला पूरक सुविधा आणि वातावरण मिळत नाही. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना संशोधकांची आणि शास्त्रज्ञांची आठवण झाली. आयसर, आयआयटी यासारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून आपण केवळ पाश्चात्य देशांसाठी संशोधक तयार करीत आहोत. पीएचडी नंतर संशोधनाच्या संधी किंवा मार्ग उपलब्ध करून दिले नाहीत, तर भारतात रांचो कसे तयार होतील, हा प्रश्नच आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आयसीएमआर पासून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रापर्यंत सर्व पातळ्यांवर आम्ही आमचे संशोधन पत्रव्यवहाराव्दारे सुपूर्त केले. परंतु, सगळ्या पातळ्यांवर आमच्या पदरी निराशाच आली. आपल्या भारतात संशोधक कमी नाहीत, परंतु इंडस्ट्रीचा देखील ते संशोधक आणि त्यांच्या संशोधनावर विश्वास बसत नाही, हे खेदजनक आहे.

यावेळी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद करताना रघुनाथ येमूल गुरूजी म्हणाले की, आज आपण जे सुखकर आयुष्य जगत आहोत, त्यामागे शास्त्रज्ञांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, आज हाच महत्त्वाचा घटक दुर्लक्षित झालेला दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या या कामगिरीला अभिवादन करण्यासाठी सी.व्ही. रमण यांना ज्या दिवशी नोबेल पुरस्कार मिळाला त्या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच नावाने हे पुरस्कार दिले जातात.

डॉ. गजानन एकबोटे, प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. संजय खरात, बारामतीचे अतिरीक्त आयुक्त अधीक्षक मिलिंद मोहिते आदी मान्यवरांनी तसेच पुरस्कारार्थी डॉ. रवींद्र नांदेडकर, डॉ. विठ्ठल बांदल, धनंजय भोळे, अंकिता नगरकर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसजीएम ग्रुपचे संचालक रमेश पाटील यांनी केले. अवनि संस्थेच्या अध्यक्षा डॉ. निवेदिता एकबोटे यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *