What is going on in the name of youth status symbol?

#Incident at Arai Hill :तरुणाईचे स्टेटस सिम्बॉलच्या नावाखाली काय सुरु आहे? : अराई टेकडीवरील घटनेने सुन्न करणारे अनेक अनुत्तरीत प्रश्न

महाराष्ट्र लेख
Spread the love

Incident at Arai Hill :अगदी चार दिवसांपूर्वी, नशेत धुंद असलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला. हा व्हिडिओ समाजातील सर्वच थरातील घटकांनी पाहिला आणि अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पुढे आल्या.एक माणूस म्हणून,आई म्हणून आणि समुपदेशक म्हणून माझेही मन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्षणभर सुन्न झाले. नेमकी आपली ही तरुण पिढी कोणत्या मार्गाने पुढे जात आहे व या अशा बिघडलेल्या पिढीचे भविष्य काय? याची काळजी वाटली. (What is going on in the name of youth status symbol?)


अनेक अनुत्तरीत प्रश्न

हा व्हिडिओ पाहताना, तुमच्यासारखे माझ्या मनात अनेक प्रश्न आले. या मुली शिक्षणाकरिता परगावातून पुण्यात आल्या होत्या का?, त्यांना नशेच्या पदार्थांची माहिती व नशा करायची सवय होती का?, त्यांना, कोणी त्यांच्या नकळत नशेचा पदार्थ दिला होता का ? त्यांच्या बरोबर इतर काही मित्र-मैत्रिणी होत्या का? या दोघी नशेत धुंद झाल्यानंतर, त्यांना तिथेच टाकून ते निघून गेले का? या मुलींचे कोणी लैंगिक शोषण केले असते तर किंवा नशेच्या अंमलात असताना केले का? असे अनेक प्रश्न माझ्या काहूर माजवीत होते. आपल्या सर्वांच्या मनातील हे प्रातिनिधिक प्रश्न आणि त्यांची उकल करण्याचा प्रयत्न…

पालकांची अवस्था

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पालकांनी हा व्हिडिओ पाहिला असेल का ? त्यांच्या पर्यंत तो पोहोचला का ?  त्या मुलींच्या पालकांची नेमकी मनस्थिती व प्रतिक्रिया  कशी होती?

मुलींवर ठेवलेल्या विश्वासाला बसलेला धक्का  पालक सहन करू शकतील का?पालकांनीच कधी काळी मुलींना काही व्यसनांची ओळख करून दिली होती का? असे अनेक प्रश्न उभे रहात होते.

या मुली उच्चभ्रू  घरातील असल्यास, ही केस पुन्हा चर्चेत ही येणार नाही पण पालक म्हणून आपण या केसच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या पाल्याकडे डोळसपणे बघणे आवश्यक आहे. आपण सजग  पालक आहोत का? याचे ही मूल्यमापन करणे आज गरजेचे आहे. 

स्टेटस सिम्बॉल

आज फॅशन म्हणून अथवा स्टेटस म्हणून, अनेक कुटुंबात अगदी पालक; मुलांना (मुलींना सुद्धा) अनेक व्यसनांची ओळख करून देतात. अनेक केसेस मध्ये मी अगदी १०वी १२वी पास झाले म्हणून, दारूच्या पार्ट्या मुलांसह करणारे पालक पाहिले आहेत. (अनेकदा ही सुरुवात बियर पासुन होते व पुढे अंमली पदार्थापर्यंत अगदी सहज पोहचते). अशा गोष्टी मुलांना व्यसनांकडे वळण्यास प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात व ओघाने व्यसने करण्यातील नियमितता व सहजता वाढीस लागते. (पुढे यापैकी अनेक मुले-मुली समुपदेशनाकरिता येतात हे वेगळे सांगायला नको).

भोगवाद

अशी विचारसरणी असलेल्या कुटुंबातील या मुली होत्या का? भारतीय समाजव्यवस्थेत व अगदी आपल्या कुटुंबव्यवस्थेत ‘कृतज्ञता’ हे दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचे मूल्य आहे परंतु आज कुटुंबातून वाढीस लागणारी भोगवादी वृत्ती ही अशा घटना वाढविण्यात कारणीभूत ठरत आहे का? भोगवादी वृत्तीचे मानसिक स्तरावरील हिंसक टोक म्हणजे स्वकेंद्रित वृत्तीचा उगम असते.

मी माझे

“माझे आयुष्य, माझे सुख, माझा आनंद, माझी मर्जी” ही विचारसरणी आज युवा पिढीत यामुळेच मूळ धरू लागली आहे का?.पालकांनी आपल्या पाल्यास नको इतके स्वतंत्र देणे अथवा त्यांना कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण न विचारणे हे देखील आज अशा अनेक प्रश्नांचे मूळ ठरत आहे. कुटुंबातील संवादच, मुळात कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवनातील समस्या, टेंशन, काळजी याला वाट करून दयायची कुटुंबातील व्यवस्थाच संपुष्टात आली आहे. त्यामुळेही दुर्दैवाने मार्ग निघतो तो व्यसनांकडे जाणारा. अनेक पालक वेळ नाही,  या सबबीखाली मुलांशी संवाद करण्याचे टाळतात. मात्र याचा दुष्परिणाम म्हणून मुले वाम मार्गाला सहज जाऊ शकतात.

संवाद आवश्यक

संवाद हा मनातील भाव भावनांच्या प्रकटीकरणाचे एक माध्यम असते. एखादयाच्या मनातील नेमक्या भावना – भावनिक गोंधळ ओळखण्याचे साधन असते. त्यामुळे आपल्या पाल्याशी रोज संवाद हा हवाच.

अतिलाड

अनेक पालक मुलांना खूप लहान वयापासून मोठा पॉकेट मनी देत असतात. मुलांना दिलेल्या पैशाचा  हिशोब कसा मागायचा? हा संकोच बाळगणारे अनेक पालक पाहण्यात येतात. नेमके येथेच मुलांवरील सात्विक धाक संपुष्टात येतो, नाही का? मुलांना प्रश्न विचारणे, प्रसंगी जाब विचारणे हे न केल्यास मात्र  मुले नको तेथे धीट होत जातात व का, कुठे, कसे, कधी, केव्हा, कोणी या शब्दांची त्यांना पुढे कधीही भीती वाटत नाही. मुलांना चुका, गैरवर्तन, गैरवावर या सगळ्या पासून लांब ठेवण्याच्या दृष्टीने हे शब्द मोलाची भूमिका बजावित असतात.

आकर्षण आणि प्रलोभने

सकस व समृद्ध आयुष्य जगण्याकरिता प्रश्न विचारणे व त्याची उत्तरे देणे ही जीवनावश्यक व महत्त्वाची अशी जीवन कौशल्ये आहेत.  

ग्रामीण भागातून अनेक हुशार व बुद्धिमान मुली शिक्षणाकरिता पुण्यासारख्या शहरात येतात. शहरातील झगमगाटात अनेकदा त्या हरवून जातात. नव्याने दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही चांगल्याच असतात असे नव्हे पण मुलींचे अडनिडे वय, मित्र-मैत्रीणींचा प्रभाव (peer pressure), हाती असलेला पैसा, दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा अनुभव घेण्याची उर्मी या सगळ्यातून अनेकदा तरुण मुली ( मुले सुद्धा) नको त्या गोष्टींमध्ये अडकतात.

आज ड्रग्ज व तत्सम नशेचे पदार्थ सहज व मुबलक प्रमाणात पुण्यासारख्या ठिकाणी मिळतात. ‘ससून सारख्या शासकीय व्यवस्थेतून ड्रग्जची  विक्री’ हे सत्र गाजत असतानाच, हा व्हिडिओ समोर येणे या सगळ्या गोष्टीतील गांभीर्य व काळजी अधोरेखित करते.

पालक म्हणून सजगता

पालक म्हणून मुले आपल्या जवळ असो अथवा लांब आपली पालक म्हणून जबाबदारी ही कायम असते. आधुनिक जगातील पालकांनी ‘जबाबदार पालकत्व’ या पलीकडे जाऊन ‘डोळस पालकत्व’ स्विकारणे आवश्यक आहे. आज कुटुंबांवर धडकणारी बाहेरील आव्हाने, आपल्या संस्कारांवर आक्रमण करीत आहेत. याचा थेट परिणाम म्हणून काही प्रसंगात आपले संस्कार दुबळे पडताना दिसतात. कुटुंबातून दिले जाणारे संस्कार हे दैनंदिन स्तरावर पुन्हा-पुन्हा तपासणे व कार्यान्वित ठेवणे आज गरजेचे आहे.

मुलांपुढे एक पाऊल विचार करण्याची आपली क्षमता आपण वाढविणे आज गरजेचा आहे. दैनंदिन स्तरावर मुलांशी सकस व थेट संवाद करण्याची आपली तयारी (वेळ) हवी. मुख्य म्हणजे मुलांचा दिनक्रम यावर आपले बारीक लक्ष हवे. कारण नसताना आपल्या मुलांचा दिनक्रम बदलणे ही धोक्याची सुचना असते. याकडे आपले दुर्लक्ष झाले तर मात्र आपले मुलं परतीचे दोर कापत आपल्या पासून खूप दूर गेलेले असते हे नक्की.

या मुलींच्या बाबतीत असेच काही झाले असेल का? पालकांनी आपल्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना नियमित भेटणे, कॉलेजमध्ये जाऊन भेटणे, सुट्टीच्या दिवशी रूम वर अथवा हॉस्टेलवर भेटणे, कधी न सांगता भेटायला जाणे, त्यांच्या मित्र मैत्रीणींना भेटणे, त्यांना जेवायला नेणे-घरी बोलविणे इ नक्की केले पाहिजे. यानिमित्ताने आपल्या मुलांच्या मित्रपरिवाराचा बौद्धिक व भावनिक आवाका लक्षात येतो. मुख्य म्हणजे त्यांच्या मनी असलेल्या धाडसाची मर्यादा लक्षात येते.

हे करू शकतो का ?

सुट्टीला मुले घरी आली की किंवा अगदी ठरवून महिन्यातून २-३ वेळा त्यांना तेलाने मॉलीश करून, अंघोळ घालावी. यानिमित्ताने मुलांच्या शरीरावरील काही खुणा, बदल आपल्याला सहज लक्षात येऊ शकतात. नशेची सवय असणाऱ्या मुलांच्या अंगावर टोचल्याच्या, भाजल्याच्या  खुणा नक्की दिसून येतात.

कोणत्याही शाळेत जाऊन किंवा कोर्स करून पालकत्व शिकता / शिकविता येणार नाही तर अनुभवाच्या शाळेतूनच पालकत्व निभावता येते. त्यामुळे एक टीप एकाला लागू पडली तरी दुसऱ्याला पण पूर्णपणे उपयोगी ठरेलच असे नाही पण तरीही ढोबळ मानाने पालकांनो हे नक्की कराच…

प्रतिबंधात्मक काम पालकांनी डोळसपणे करणे तितकेच महत्त्वाचे आहे  

मुलांना सुयोग्य वेळ देणे यातील सर्वात महत्त्वाचे. मुलांच्या दिनक्रमासह मुलांच्या देहबोलीवर देखील आपल्याला पालक म्हणून लक्ष ठेवता आले पाहिजे.

मुलांच्या स्वभावातील, भाषेतील बदल व मुख्य म्हणजे शारीरिक हालचालींमधील बदल याकडे आपले विशेष लक्ष हवे. येणारे फोन, त्यानंतर मुलांच्या देहबोलीत होणार फरक अशा अनेक गोष्टी आपल्या नजरेत आल्याच पाहिजेत.

पालकांमधील मतभेद अथवा त्यांच्या वैवाहिक जीवनातील बेबनाव हे देखील मुलांना वाकडया वाटेकडे नेवू शकतात. समायोजन करीत, सामंजास्याने आपले प्रश्न सोडविण्याचे कसब पालकांनी मुलांचे ‘भविष्य’ असे मोठे उद्दिष्ट  ठेवत शिकलीच पाहिजेत.

मुख्य म्हणजे आपले मुल चुकलेच तर त्याला प्रथम आधार द्या, मदत करा, पाठीशी उभे राहा. पुन्हा त्याच वाटेला जाणार नाही याची खबरदारी घ्या.      

*स्मिता कुलकर्णी* – ९८२२७५२०५६

(लेखिका कुटुंब प्रबोधन प्रांत मंडळ सदस्य व ज्येष्ठ समुपदेशक आहेत.)

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *