पुणे(प्रतिनिधि)–जेव्हा ‘कनव्हिन्स’ करता येत नाही तेव्हा ‘कनफ्युज’ केले जाते. कॉँग्रेसकडे कोणताही विचार नाही, कार्यक्रम नाही, त्यामुळे ते ‘कनफ्यूज’ करीत आहेत. कोणतेही सरकार आले तरी घटनेची मूलभूत तत्व बदलता येत नाहीत. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात घटनेची मोडतोड केली. साठ वर्षांच्या काळात कॉँग्रेसने ८० वेळा घटनेची मोडतोड करण्याचं पाप केलं अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
पुणे लोकसभा महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित् जाहीर सभेत गडकरी बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, स्वरदा बापट, शैलेश टिळक, मंदार जोशी, रूपाली पाटील, राजेंद्र काकडे, दत्ता सागरे, वनराज आंदेकर, किरण साळी, हर्षदा फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, मी आणीबाणीच्या काळापासून कामात आलो आहे. स्व. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात घटनेची एवढी मोडतोड केली की घटना उद्ध्वस्त केली. नंतर जनता पार्टीने पुन्हा बदलवून ती प्रस्थापित केली. साठ वर्षांच्या काळात कॉँग्रेसने ८० वेळा घटनेची मोडतोड करण्याचं पाप केलं आणि ते भाजपच्या नावाने विषारी प्रचार करीत आहेत की यांना ४०० जागा मिळाल्या तर हे संविधान बदलवणार म्हणून. मात्र, संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
सांप्रदायिकता, जातीयवादाचे राजकारण काँग्रेस करत आहे. गरीबीला जात, धर्म नसतो, गरीबी, भूकमारी ही खरी समस्या आहे. जे जनतेचा विश्वास संपादन करत नाहीत ते जातीची ढाल पुढे करतात. समाजातील अस्पृश्यता, जातीयता दूर झाली पाहिजे शिवशाही आणि रामराज्य व्हावे ही भाजपची विचारधारा आहे. सेक्युलर म्हणजे सर्वधर्मसमभाव धर्मनिरपेक्षता नाही. हा सर्वधर्मसमभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासला. जात, पथ, भाषा, लिंग यात कोणतेही भेद न करता आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.
नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्याला आता नवीन पुण्याची गरज
महाराष्ट्राला गेल्या पाच वर्षांत ५ लाख कोटी रुपये दिले. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण असे प्रश्न आहेत. स्वारगेटसारखी गर्दी विमानतळावर होते. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्याला आता नवीन पुण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, की गिरीश बापट आणि मुक्ता टिळक प्रचार सभेत नाहीत असे पहिल्यांदाच होत आहे. पुण्याची मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न सुटत नव्हता. संरक्षण विभागाकडून परवानगी घेऊन विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला. तसेच मेट्रोच्या बाबतीतही झाले. या दोन्हीची कामे वेगाने झाली. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत जाता येईल असा रस्ता करत आहोत. पुणे बेंगलोर मार्गाचे कामही सुरू होणार आहे. पुणे नाशिक, तळेगाव-चाकण-शिक्रापूर डबलडेकर उड्डाणपूल होणार आहे. किवळे तेनललेपूल नवा उन्नत मार्ग करण्यात येणार आहे. १२ हजार कोटी खर्च करून पालखी मार्ग केला आहे. त्याचे उद्घाटन निवडणुकीनंतर होणार आहे. काश्मीरला कन्याकुमारीशी रस्त्याने जोडण्याचे स्वप्न डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. मोदी सरकारने उद्योग, रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. त्यामुळे निर्यात तीन पट वाढली आहे. देश प्रगतीपथावर आहे. आयात कमी करून निर्यात वाढवली पाहिजे. इंडियन ऑईल इथेनॉलचे ३०० पंप सुरू करणार आहे. नदी काठसुधार प्रकल्पातून पुण्याचे सौंदर्यीकरण होणार आहे.
दरिद्री नारायणाला परमेश्वर मानून आम्ही कार्यरत आहे. २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर पडले, तर देशात गरिबी राहणार नाही. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन म्हणजे सेक्युलरिझम नाही. मी जे बोलतो, ते करतो, जे करतो, ते सांगतो. मी बोललो ते केले नाही दाखवणारा एकही माय का लाल पैदा झाला नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
पुणे वर्तुळाकार मार्गाचे काम आता होत आहे. माझी एक चूक झाली, ती म्हणजे मुंबई पुणे एक्प्रेस हायवेचे काम करताना २५ वर्षांचा विचार करून काम करायला हवे होते. पण आता वर्तुळाकार मार्गामुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे. महामार्गावरील वाहतूक शहरात येणार नाही, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
काँग्रेसने जे ६० वर्षांत नाही केले त्याच्या तीन पट काम भाजपने केले. शेतकरी, विकास व्हावा, सर्व सुखी व्हावे हा आमचा विचार आहे. कम्युनिस्ट विचारधारा संपली, समाजवादी संपले, स्वतंत्र पक्ष संपले. भारताच्या विकासाचा संबंध येणारे सरकार कोणत्या आर्थिक नितीवर चालणार यावर देशाचे भवितव्य ठरणार असून आर्थिक, सामाजिक मागास, तळागाळातल दरिद्री नारायणाला परमेश्वर मानून काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
रोटी, कपडा और मकान शेवटच्या घटकाला मिळवून देणे हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे चिंतन आमच्या विचाराचा आधार आहे. म्हणून गेल्या १० वर्षांत २५ कोटी लोक दारिद्य्र रेषेबाहेर आले. पुढल्या २५ वर्षांत गरीबी राहणार नाही. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल.
हा देश बदलणार, स्मार्ट सिटीबरोबर स्मार्ट व्हिलेज होणार, तरुणांना रोजगार मिळणार, विज्ञान व तंत्रज्ञान, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, साहित्य, कला, संस्कृती यांच्या सहायाने देशाला विश्वरूप करणार. ते करण्यासाठी योग्य निती, योग्य नेतृत्व हवे, राष्ट्राच्या पुननिर्माणासाठी तुमचे आशिर्वाद पाहिजे. दहा वर्षांत मोदी सरकारचे काम हा ट्रेलर होता ‘असली फिल्म बाकी आहे’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएचा विजय व्हावा त्यासाठी पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गिरीश बापट, मुक्ता टिळक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचे आहे. देशात ३ कोटी मतदान मोदीजींना होईल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
मोहोळ म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे. यात देशाचे भवितव्य निश्चित होणार आहे. लोकांचा पाठींबा मिळतो आहे. कारण दहा वर्षांचे काम, मेट्रो, ई बसेस, चांदणी चौक, नदी प्रकल्प, मेडिकल कॉलेज मोदींनी पुण्याला दिले.पुण्याचे एक मत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी द्या. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार आणावे असे आवाहन त्यांनी केले.